IND vs BAN Live Match Updates । चेन्नई : आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीत कमाल केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने घातक मारा करत बांगलादेशला सळो की पळो करुन सोडले. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने २३ षटकांत ३ बाद ८१ धावा केल्या. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयाकडे कूच केली. चेन्नई येथे होत असलेला भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना नाना कारणांनी चर्चेत आहे. पहिल्या दिवशी आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या मोठ्या भागीदारीमुळे पाहुण्या बांगलादेशची पळता भुई थोडी झाली. टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. मग फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला चांगलाच संघर्ष करावा लागला.
जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप यांनी सुरुवातीपासूनच दबाव टाकला. बांगलादेशचा संघ अवघ्या १४९ धावांत गारद झाला अन् भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले, तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल (१०), रोहित शर्मा (५) आणि विराट कोहली (१७) धावा करुन बाद झाला. शुबमन गिल ३३ धावांसह खेळपट्टीवर टिकून आहे. खरे तर विराटला त्याच्या चुकीमुळे तंबूत परतावे लागले. मेहदी हसनच्या षटकात विराट बाद झाला. पॅडला चेंडू लागल्याचे समजून पंचांनी त्याला बाद दिले. मात्र, चेंडूने बॅटच्या किनाऱ्याला स्पर्श केला होता. विशेष म्हणजे विराटने तिसऱ्या पंचांची मदत न घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला. कोहलीने रिव्ह्यू न घेतल्याने कर्णधार रोहित शर्मा आणि पंचांनी देखील बोलकी प्रतिक्रिया दिली.