नवी दिल्ली : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात देखील भारत मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सामन्यातील दुसरा दिवस असून भारत आपल्या पहिल्या डावात 54 षटकांपर्यंत 4 बाद 184 धावांवर खेळत आहे. रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर हे खेळपट्टीवर टिकून आहेत. खरं तर भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली होती.
भारतीय संघ मजबूत स्थितीतभारताकडून कर्णधार लोकेश राहुल (10), शुबमन गिल (20), चेतेश्वर पुजारा (24) आणि विराट कोहली (24) धावांवर तंबूत परतले. मात्र रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करून डाव सावरला. पंत सध्या 73 चेंडूत 66 धावांवर खेळत आहे. तर श्रेयस अय्यर 37 चेंडूत 29 धावांवर नाबाद आहे. यजमान बांगलादेशच्या संघाकडून तैजुल इस्लामला सर्वाधिक 3 बळी घेता आले तर तस्किन अहमदला 1 बळी घेण्यात यश आले. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाच्या सांघिक खेळीमुळे संघ आताच्या घडीला मजबूत स्थितीत आहे.
भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली. मोमिनूल हक वगळल्यास बांगलादेशच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टीकता आले नाही. 5 बाद 213 वरून बांगलादेशचा संपूर्ण संघ 227 धावांवर तंबूत परतला. आर अश्विन व उमेश यादव यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या आणि भारताला कमबॅक करून दिले.
भारताची शानदार गोलंदाजी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली तेव्हा बहुतेक चाहते थक्क झाले. टीम इंडियाने मागील सामन्यातील हिरो कुलदीप यादवला वगळले आणि त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) संधी दिली. जयदेव पूर्ण 12 वर्षे, 2 दिवसांनंतर टीम इंडियाच्या टेस्ट प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला. जयदेवने 16 डिसेंबर 2010 रोजी कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर तो आज मैदानावर उतरला. जयदेवने दुसरी कसोटी खेळण्यापूर्वी 118 कसोटी सामन्यांना त्याला मुकावे लागले. दुसरी कसोटी खेळण्यासाठी कोणत्याही भारतीयाची ही सर्वात मोठी प्रतीक्षा आहे. लाला अमरनाथ यांच्या दोन कसोटी सामन्यांमधील अंतर हे 12 वर्ष व 129 दिवसाचे होते. बांगलादेशचा संपूर्ण संघ 227 धावांवर माघारी परतला. उमेशने 25 धावांत 4 आणि अश्विनने 71 धावांत 4 बळी घेतले, तर उनाडकटने 2 बळी घेतले.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
दुसऱ्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ - शाकिब अल हसन (कर्णधार) नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"