R Ashwin Zaheer Khan, India vs Bangladesh Tests: बांगलादेश संघ या महिन्यात भारत दौऱ्यावर असणार आहे. १९ सप्टेंबरपासून भारत-बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला कसोटी सामना १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान चेन्नईच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत माजी गोलंदाज झहीर खानचा विक्रम अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या निशाण्यावर असणार आहे. पहिल्या सामन्यात जर अश्विनच्या फिरकीची जादू चालली, तर तो झहीर खानचा मोठा विक्रम मोडेल.
झहीर खानचा विक्रम
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम झहीर खानच्या नावावर आहे. त्याने ७ सामने खेळले असून, त्यात ४ च्या इकॉनॉमी रेटने ३१ विकेट घेतल्या. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातही त्याने दोनदा ५ बळी घेतले. एका डावात त्याची सर्वोत्तम कामगिरी २२ धावांत ५ बळी अशी होती. दोन्ही देशांमधील कसोटी सामन्यांत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज इशांत शर्मा आहे. त्याने ७ सामन्यांत २५ विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनला खुणावतोय मोठा विक्रम
रविचंद्रन अश्विन या यादीत नंबर-१ होण्यापासून फक्त ९ विकेट्स दूर आहे. ९ विकेट्स घेऊन अश्विन भारत-बांगलादेश कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकेल. अश्विनने आतापर्यंत २३ विकेट्स घेतल्या असून तो यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने ६ सामन्यात या विकेट्स घेतल्या आहेत. या कालावधीत त्याने दोनदा ४ बळी आणि एकदा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.