बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND vs BAN Test Series) रिषभ पंत कसोटी संघातील कमबॅकसाठी तयार आहे. १९ सप्टेंबरला चेन्नईच्या मैदानात भारत बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. भारतीय स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंत तब्बल ६३४ दिवसांनी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. मोठ्या प्रतिक्षेनंतर मैदानात उतरल्यावर त्याला नवा इतिहास रचण्याची संधी आहे. त्याला या कमबॅकच्या कसोटी मालिकेत सिक्सरचा खास रेकॉर्ड खुणावतोय.
पंतच्या निशाण्यावर असेल सौरव गांगुली अन् कपिल पाजींचा रेकॉर्ड रिषभ पंत हा विकेटमागील चपळ कामगिरीशिवाय उत्तुंग फटकेबाजीसाठी ओळखला जातो. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात मोठ्या फटकेबाजीसह त्याला वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन कपिल देव (Kapil Dev) आणि भारतीय संघाची बांधणी करण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सौरव गांगुली (Sourav Ganguly) या दिग्गजांना मागे टाकण्याची संधी आहे.
कोणता आहे तो रेकॉर्ड?
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत या दोन दिग्गजांना मागे टाकून पुढे जाण्यासाठी पंतला चेन्नईतील एकमेव सामना नव्हे तर एक डावही पुरेसा आहे. कपिल देव यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत ६१ षटकार मारले आहेत. दुसरीकडे सौरव गांगुलीच्या भात्यातून कसोटीत ५७ षटकार पाहायला मिळाले आहेत. एका डावात या दोन्ही दिग्गजांना मागे टाकण्याची संधी रिषभ पंतकडे असेल.
७ षटकारासह मोठी झेप घेण्याची संधी
कसोटी क्रिकेटमध्ये अगदी तोऱ्यात बॅटिंग करण्यात माहिर असणाऱ्या पंतच्या खात्यात आतापर्यंत खेळलेल्या ३३ कसोटी सामन्यात ५५ षटकारांची नोंद आहे. जर बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने ७ षटकार मारले तर तो कपिल देव आणि सौरव गांगुली यांना मागे टाकेल. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सहाव्या स्थानावर पोहचेल. या यादीत भारताचा माजी स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवाग अव्वलस्थानावर आहे.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
सेहवागनं आपल्या कसोटी कारकिर्दीत ९१ षटकार मारले आहेत. तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत रोहित शर्माचा नंबर लागतो. रोहितच्या भात्यातून आतापर्यंत ८४ षटकार पाहायला मिळाले आहेत. महेंद्रसिंह धोनी या यादीत ७८ षटकारांसह तिसऱ्या तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ६७ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा या यादीत टॉप ५ मध्ये आहे. त्याच्या खात्यात ६४ षटकारांची नोंद आहे. कपिल देव ६१ आणि सौरव गांगुली ५७ षटकारांसह अनुक्रमे सहाव्या सातव्या स्थानावर आहेत. पंत या दोघांना मागे टाकत सहाव्या स्थानावर झेप घेऊ शकतो.