Rishabh Pant Injury: भारत-बांगलादेश यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी रिषभ पंत मालिकेतून माघार घेत असल्याचे BCCI ने जाहीर केले. दुखापतग्रस्त रिषभ पंत किमान दोन दिवस ढाकामध्ये राहणार आहे. बीसीसीआयने त्याला वन डे संघातून मुक्त केले असले तरी तो संघासोबतच राहीला आहे आणि यादरम्यान तो लाइट जिम सेशनही करेल. कसोटी मालिकेपूर्वी तो थोड्या विश्रांतीसाठी मायदेशी परतणार की नाही, यावर बीसीसीआय एक-दोन दिवसांत निर्णय घेईल. भारताची कसोटी मालिका १४ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
रिषभ पंतला पाठीला दुखापत झाली आहे. न्यूझीलंड दौऱ्यापासून तो पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने अनौपचारिकपणे संघ व्यवस्थापनाशी त्याच्या फिटनेसची तपासणी केली. तथापि, त्याने त्याच्या दुखापतीबद्दल सामन्याच्या दिवशी संघ व्यवस्थापनाला का कळवले, हे आश्चर्यकारक आहे. त्याची दुखापत गंभीर नसल्यास तो पूर्णपणे सरावाला सुरुवात करेल. तो अजूनही BCCIच्या वैद्यकिय टीमच्या देखरेखेखाली आहे. पण, जर तो भारतात परतला, तर त्याला NCA ( राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत) दाखव व्हावे लागेल.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्याची प्लेइंग इलेव्हन समोर आल्यानंतर त्यात रिषभ पंतचे नाव दिसले नाही. त्यानंतर BCCI ने स्टेटमेंट जाहीर केले आणि त्यात रिषभ पंतने वन डे मालिकेतून माघार घेतल्याचे सांगण्यात आले. त्याच्याजागी बदली खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात रिषभच्या पाठीला दुखापत झाली होती आणि तो उपचार घेताना दिसला होता. तेव्हाच त्याच्या वन डे मालिकेत खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"