Join us  

IND vs BAN : रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार? दुखापतीतबाबत आले मोठे अपडेट्स

India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:57 AM

Open in App

India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ४०४ धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या बांगलादेशला त्यांनी १५० धावांत गुंडाळले. २५४ धावांची आघाडी घेत टीम इंडिया पुन्ह मैदानावर फलंदाजीला उतरली आहे आणि चौथ्या दिवशीच विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. पण, या सगळ्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्याने तिसऱ्या वन डे सह पहिल्या कसोटीतून  माघार घेतली होती.

World Test Championship : कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायचीय? ICC ने ठेवलं भारतासमोर आव्हानात्मक गणित

रोहित शर्माला दुसऱ्या वनडे दरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. स्कॅन केल्यानंतर रोहितचा अंगठा निखळल्याचे आढळून आले. पण संघ अडचणीत असताना रोहित अशा परिस्थितीतही फलंदाजीला आला, परंतु तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. यानंतर रोहित उपचारासाठी मुंबईत आला आणि आता रोहित पूर्णपणे तंदुरुस्त असून दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, रोहित शर्मा बांगलादेशला आज किंवा उद्या रवाना होणार आहे.  

बीसीसीआयने रोहितच्या दुखापतीबद्दल आधीच सांगितले होते की वैद्यकीय संघ त्याची पूर्ण काळजी घेत आहे आणि आम्हाला आशा आहे की तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पराभवानंतर टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिकाही गमावली. अशा स्थितीत रोहितला संघासाठी कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. रोहित शर्मासाठी २०२२ हे वर्ष पूर्णपणे फ्लॉप ठरले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कपही गमावला होता.

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावसंख्या उभी केली. त्यानंतर मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अक्षर पटेलने शेवटची विकेट घेत बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांत गुंडाळला. २५४ धावांची आघाडी असताना भारताने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशरोहित शर्माबीसीसीआय
Open in App