ढाका - बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला पहिल्या दोन सामन्यातील पराभवामुळे एकदिवसीय मालिका गमवावी लागली आहे. त्यानंतर आता भारतीय संघाचं टेन्शन अधिकच वाढण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्मासह तीन खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. तसेच कर्णधार रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्याचे समोर येत असून, तो तिसऱ्या वनडेनंतर कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघासमोरील समस्येत भर पडण्याची शक्यता आहे.
जर रोहित शर्मा कसोटी मालिकेमधून माघार घेतली तर त्याच्या अनुपस्थितीत कसोटी मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मीडियामधील रिपोर्टनुसार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलकडे कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. या मालिकेसाठी बीसीसीआयने जेव्हा संघाची घोषणा केली होती. तेव्हा के.एल. राहुललाच उपकर्णधार बनवण्यात आले होते. अशा परिस्थितीत लोकेश राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता अधिक आहे. तसेच बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीही भारतीय संघाचं नेतृत्व हे लोकेश राहुलकडे सोपवण्यात आले आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना रोहित शर्माच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो बराचवेळ पॅव्हेलियनमध्ये होता. तसेच सलामीला येऊ शकला नव्हता. भारतीय संघाचे ७ फलंदाज बाद झाल्यावर तो फलंदाजीस आला होता. तसेच अंगठ्यावर टेप लावून फलंदाजी करत त्याने झुंजार अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघ जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), के. एस. भरत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.