भारतीय क्रिकेट संघातील प्रिन्स शुबमन गिल याने चेन्नई कसोटीतील दुसऱ्या डावात दमदार शतकी खेळी केली. १७६ चेंडूत त्याने नाबाद ११९ धावा केल्या. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे पाचवे शतक ठरले. या शतकी खेळीसह त्याने द्रविड-कोहलीच नव्हे तर पाकिस्तानचा बाबर आझम आणि जो रूट या मंडळींनाही मागे टाकले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा
बांगलादेश विरुद्धच्या शतकी खेळीनंतर शुबमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. एका शतकी डावात शुबमन गिलनं भारताचा स्टार बॅटर विराट कोहली, रिषभ पंत, मयंक अग्रवाल यांना मागे टाकले. या तिघांच्या नावे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत प्रत्येकी ४-४ शतकांची नोंद आहे. या यादीत रोहित शर्मा ९ शतकांसह टॉपला आहे.
या दिग्गजांच्या विक्रमाला लावला सुरुंग
पहिल्या डावात भोपळा पदरी पडलेल्या शुबमन गिलनं भारताच्या दुसऱ्या डावातील ६० व्या षटकात मेंहदी हसन मिराझच्या षटकातील चौथ्या चेंडूवर कसोटी कारिकर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. शतकी खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. या शतकासह त्याने कोहली, सेहवाग, चेतेश्वर पुजारा आणि राहुल द्रविड यांचा खास विक्रम मागे टाकला. कमी वयात पाचवे कसोटी शतक झळकवण्याचा विक्रम
शुबमन गिल याने २५ वर्षे १३ दिवस वयात भारतासाठी ५ वे कसोटी शतक झळकावले आहे. कोहलीनं २५ वर्षे ४३ दिवस वय असताना ५ वे कसोटी शतक झळकावले होते. सेहवागनं २५ वर्षे ६७ दिव, पुजारानं २५ वर्षे २९३ दिवस आणि द्रविड याने २६ वर्षे ४४ दिवस वय असताना हा टीम इंडियासाठी पाचवे कसोटी शतक झळकावले होते. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर टॉपला आहे. त्याने १९ वर्षे २८२ दिवस वयात पाचवे कसोटी शतक झळकावले होते.
बाबर अन् जो रुटही पडले मागे
शुबमन गिलनं २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेले हे १२ वे शतक ठरले. त्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम आणि इंग्लंडचा जो रुटही फिका ठरतो. या दोघांनी २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी ११-११ शतके झळकावली आहेत. कोहलीच्या खात्यात १० शतकांची नोंद आहे.