India vs Bangladesh, 1st Test, Day 3 : चेन्नई कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळात शुबमन गिलच्या भात्यातून अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली. डावाची सुरुवात करताना शुबमन गिल अगदी तोऱ्यात खेळताना पाहायला मिळाले आहे. पण तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायला लागला अन् त्याची गाडी ट्रॅकवरून कुठं तरी घसरली असं चित्र निर्माण झालं होते. शुबमन गिलनं आपल्या मर्जीनं मध्यफळीत खेळण्याला पसंती दिली होती. यासाठी द्रविडला त्याने मनवलं. आता हा क्रमांक म्हणजे आपली स्थावर मालमत्ता असल्याचे तोऱ्यात तो खेळताना दिसला. उपहारापर्यंत शुबमन गिलनं १३७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ८६ धावा केल्या होत्या.
दोन उत्तुंग षटकार मारत पूर्ण केलं अर्धशतक
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ८ चेंडूंचा सामना करून त्याच्या पदरी भोपला पडला होता. कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये ३ किंवा त्यापेक्षा अधिकवेळा शून्यावर बाद होणारा लाजिरवाणा विक्रमही त्याच्या नावे जमा झाला. पण यातून सावरत दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने तोऱ्यात बॅटिंग केली. एकाच षटकात दोन उत्तुंग षटकार मारत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली.
अश्विनच्या खेळीनंतर शुबमन गिलच्या भात्यातून आली "दिल है की मानता नहीं" वाली खेळी
भारताच्या दुसऱ्या डावातील ३० व्या षटकात मेहंदी हसन घेऊन आलेल्या षटकात शुबमन गिल याने दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले. यासाठी त्याने ७९ चेंडू खेळले. पहिल्या डावात आण्णा अर्थात अश्विनची शतकी खेळी बघून सावध झालेल्या शुबमन गिलनं दुसऱ्या डावात सर्व उणीवा भरून काढल्याचा सीन पाहायला मिळाला. त्याची ही खेळी अगदी 'ये गिल है...' जो थांबणार नाही. अन् "दिल है की मानता नहीं" असं शब्द उच्चारायला लावणारी आहे.
तिसऱ्या क्रमांकावर कमालीची सुधारणा
कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिल हा दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वोत्तम सरासरीसह धावा काढणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. दुसऱ्या डावातील त्याची सरासरी ही ४६ च्या घरात आहे. एवढेच नाही तर तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पहिल्या १० डावांच्या तुलनेत मागील ९ डावात त्याने कमालीची कामगिरी केली आहे. पहिल्या १० डावात त्याने २१ च्या सरासरीने १८९ धावा केल्या होत्या. ज्यात एकही शतक किंवा अर्धशतक नव्हते. पण त्यानंतरच्या ९ डावात त्याच्या भात्यातून तिसऱ्या क्रमांकावर खेळताना ६६.७० च्या सरासरीनं ४६७ धावा आल्या. ज्यात २ शतकांसह दोन अर्धशतकांचा समावेश आहे.