सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवांचा भरणा असलेल्या टीम इंडियानं हैदराबादचं मैदान मारत पाहुण्या संघाला ३-० अशी क्लीन स्वीप दिली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाल भारतीय संघाचा हा सलग तिसरा मालिका विजयही ठरला. टीम इंडियाने या सामन्यात अनेक रेकॉर्ड केले. यात सूर्यकुमार यादवही मागे राहिला नाही. त्यानेही अखेरच्या टी-२० सामन्यात आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत खास विक्रमाला गवसणी घातली.
सूर्याच्या भात्यातून आलं २१ वे अर्धशतक
हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात सू्र्यकुमार यादवनं सलामीवीर संजू सॅमसनच्या साथीनं ७० चेंडूत १७३ धावांची भागीदारी रचली. भारतीय संघाच्या कर्णधारानं बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात ३५ चेंडूत ७५ धावांची धमाकेदार खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील त्याचे हे २१ वे अर्धशतक ठरले.
असा पराक्रम करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज
बांगलादेश विरुद्धच्या तिसऱ्या सामन्याआधी सूर्यकुमार यादवनं ७३ सामन्यातील ७० डावात ४१.८५ च्या सरासरीनं २४६९ धावा केल्या होत्या. ज्यात ४ शतक आणि २० अर्धशतकांचा समावेश होता. ४१ धावांवर पोहचताच त्यानेआंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २५०० धावांचा टप्पाही पार केला. सर्वात जलदगतीने हा पल्ला गाठणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने यासाठी ७१ वेळा बॅटिंग केली आहे. अर्थात ७१ डावात त्याने ही कामगिरी करून दाखवलीये. या सामन्यात तो पाचवे शतक मारण्याच्या दिशेनं वाटचाल करत होता. ७५ धावांवर तो बाद झाला.
भारताकडून सर्वात जलदगतीनं २५०० धावांचा पल्ला गाठण्याच्या विक्रम कुणाच्या नावे?
भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने २५०० धावांचा पल्ला गाठण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने ६८ डावात हा डाव साधला होता. एकंदरीत बोलायचे तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद हा पल्ला गाठणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबर आझम टॉपला आहे. त्याने ६२ डावात ही कामगिरी नोंदवून वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. पाकच्या ताफ्यातील रिझवान याने ६५ डावात हा टप्पा पार केला होता. रोहित शर्मानं यासाठी ९२ वेळा बॅटिंग केली आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारे फलंदाज
- बाबर आझम, (पाकिस्तान)-६२ डाव
- मोहम्मद रिझवान, (पाकिस्तान)-६५ डाव
- विराट कोहली, (भारत)- ६८ डाव
- सूर्यकुमार यादव (भारत) - ७१ डाव
- ॲरॉन फिंच, (ऑस्ट्रेलिया) -७८ डाव
- मार्टिन गप्टिल, (न्यूझीलंड) - ८३ डाव