Arshdeep Singh Hardik Pandya, ICC T20 Rankings: भारतीय संघाने बांगलादेश विरूद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या टी२० मध्ये ७ गडी राखून मोठा विजय मिळवला. बांगलादेशने २० षटकांत केवळ १२७ धावाच केल्या होत्या. हे आव्हान भारतीय फलंदाजांनी १२ षटकांमध्येच पार केले. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना फारशी फटकेबाजी करूच दिली नाही. भारताकडून भेदक मारा करणाऱ्या अर्शदीप सिंगने अवघ्या १४ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यासोबतच आता ICCच्या ताज्या क्रमवारीतही त्याला बढती मिळाली आहे.
अर्शदीप सिंगला ८ स्थानांची बढती
अर्शदीप सिंगने ३ बळी घेत दमदार कामगिरी केल्याने त्याला ताज्या टी२० क्रमवारीत ८ स्थानांनी बढती मिळाली आहे. अर्शदीप सिंह या बढतीसह संयुक्तपणे आठव्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नॉर्खियादेखील आठव्या स्थानी आहे. दोघांच्याही खात्यात आता ६४२ रेटिंग पॉइंट्स आहेत. अर्शदीप हा भारताकडून Top 10 मधील एकमेव गोलंदाज आहे. मात्र Top 20 मध्ये भारताकडून आणखी तीन गोलंदाज आहेत. रवी बिश्नोई (१ स्थान), अक्षर पटेल (३ स्थान) आणि कुलदीप यादव (१ स्थान) या तिघांचीही क्रमवारीत घसरण झाली आहे. इंग्लंडचा आदिल रशिद क्रमवारीतील अव्वल स्थान राखून आहे. (पाहा संपूर्ण यादी)
हार्दिक पांड्या अष्टपैलूंच्या यादीत Top 3 मध्ये
भारताच्या पहिल्या टी२० मध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या हार्दिक पांड्यालाही त्याच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. हार्दिकने पहिल्या टी२० मध्ये १ बळी टिपला होता. तसेच १६ चेंडूत नाबाद ३९ धावा कुटल्या होत्या. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर हार्दिकने ४ स्थानांची झेप घेत तिसरे स्थान पटकावले आहे. त्याच्या खात्यात आता २१६ गुण आहेत. Top 20 मध्ये भारताचा अक्षर पटेल संयुक्त ११व्या स्थानी कायम आहे. (पाहा संपूर्ण यादी)
यशस्वी जैस्वालची घसरण
टी२० फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीनुसार, Top 10 मधील सूर्यकुमार यादवने आपले दुसऱ्या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. तसेच ऋतुराज गायकवाडही नवव्या स्थानी कायम आहे. यशस्वी जैस्वालची एका स्थानाने घसरण झाली आहे. तो ७४९ रेटिंग पॉइंटसह पाचव्या स्थानी आला आहे. (पाहा संपूर्ण यादी)