IND vs BAN T20 Series : सहा ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. बीसीसीआयने शनिवारी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. भारत आणि बांगलादेश यांच्यातील ३ सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसह ट्वेंटी-२० संघ दोन महिन्यांहून अधिक कालावधीनंतर मैदानात परतणार आहे. यापूर्वी टीम इंडियाने जुलैच्या शेवटी श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० मालिका खेळली होती. त्या मालिकेतील अनेक खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात आले आहे. खरे तर पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
आयसीसीच्या ट्वेंटी-२० क्रमवारीत ऋतुराज गायकवाड नवव्या क्रमांकावर आहे. तरीदेखील त्याला संघात स्थान न मिळाल्याने चाहत्यांनी रोष व्यक्त केला. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बीसीसीआयला लक्ष्य केले. मागील काही सामन्यांमध्ये ऋतुराजने चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या सात ट्वेंटी-२० सामन्यांमध्ये त्याने ७१.२ च्या सरासरीने आणि १५७.४५ च्या स्ट्राईक रेटने ३५६ धावा केल्या आहेत. मराठमोळ्या ऋतुराजची अखेरची झिम्बाब्वे दौऱ्यावर भारताच्या ट्वेंटी-२० संघात निवड झाली होती. त्या दौऱ्यात त्याने वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करताना साजेशी खेळी केली होती. त्यानंतर त्याला श्रीलंका आणि आता बांगलादेश दौऱ्यातून वगळण्यात आले. ऋतुराज गायकवाडने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण सहा वन डे आणि २३ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत.
भारताचा संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्थी, जितेश शर्मा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.
IND vs BAN ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक
- ६ ऑक्टोबर - ग्वाल्हेर, सायंकाळी ७ वाजल्यापासून
- ९ ऑक्टोबर - नवी दिल्ली, सायंकाळी ७ वाजल्यापासून
- १२ ऑक्टोबर - हैदराबाद, सायंकाळी ७ वाजल्यापासून