Team India World Record Most 18 Consecutive Test Series Win : भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धच्या दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याचा निकाल लागणं मुश्किल वाटतं होते, पण चौथ्या दिवशी परफेक्ट गेम प्लानसह मैदानात उतरत टीम इंडियाने कानपूरच्या मैदान गाजवलं. या मालिका विजयासह भारतीय संघाच्या आपला वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला आहे. घरच्या मैदानात सलग १८ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम टीम इंडियाने करून दाखवला आहे. अन्य कुणालाही अशी कामगिरी करता आलेली नाही.
इंग्लंड विरुद्ध गमावली होती शेवटची मालिका, पण..
भारतीय संघाने फेब्रुवारी २०१३ पासून घरच्या मैदानात १८ मालिका खेळल्या आहेत. यात एकदाही भारतीय संघाने मालिका गमावलेली नाही. भारतीय संघाने २०१२-१३ मध्ये घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध अखेरची मालिका गमावली होती. धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला १-२ अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मात्र भारतीय संघ घरच्या मैदानातील कसोटी मालिकेत अजिंक्य राहिला.
ऑस्ट्रेलियाच्या खूप पुढे आहे टीम इंडिया
मालिका विजयाच्या विक्रमी कामगिरीच्या प्रवासात भारतीय संघाने फक्त ५ कसोटी सामने गमावले आहेत. घरच्या मैदानात सातत्यपूर्ण कामगिरीसह सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणाऱ्या संघाच्या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. १९९४ ते २००० आणि २००४ ते २००८ दोन वेळा त्यांनी घरच्या मैदानात सलग १० कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
भारतीय संघाचा घरच्या मैदानातील मालिका विजयाचा रेकॉर्ड
- बांगलादेश- २-०
- इंग्लंड- ४-१
- ऑस्ट्रेलिया-२-१
- श्रीलंका- २-०
- न्यूझीलंड- १-०
- इंग्लंड- ३-१
- बांगलादेश- २-०
- दक्षिण आफ्रिका- ३-०
- वेस्ट इंडीज- २-०
- अफगाणिस्तान-१-०
- श्रीलंका-१-०
- ऑस्ट्रेलिया - २-१
- बांगलादेश- १-०
- इंग्लंड - ४-०
- न्यूझीलंड- ३-०
- दक्षिण आफ्रिका - ३-०
- वेस्ट इंडीज - २-०
- ऑस्ट्रेलिया - ४-०
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात जवळपास अडीच दिवस वाया गेल्यानंतर टीम इंडियाने चौथ्या दिवशी खेळलेल्या गेम प्लानसह पाचव्या दिवसाचा खेळ अगदी लवकर संपवत मालिका २-० अशी खिशात घातली.