मीरपूर : ‘मॅचविनर’ असलेल्या कुलदीप यादवला वगळणे अविश्वसनीय असल्याचे संबोधून संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराच्या या निर्णयावर माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी सडूकन टीका केली. डावखुरा अनुभवी फिरकीपटू कुलदीपने चटगावच्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात ४० धावांत पाच आणि दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. ११३ धावांत ८ फलंदाजांना बाद करताच भारताने १८८ धावांनी सामना जिंकला होता.
या कामगिरीनंतरही त्याला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले. मीरपूरची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. चायनामॅन गोलंदाजाच्या जागी जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला आहे. सुनील गावसकर यांनी या निर्णयावर अतिशय प्रामाणिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘अविश्वसनीय, हा एकमेव शब्द आहे जो मी वापरू शकतो आणि तो सौम्य शब्द आहे. मला खूप कठोर शब्द वापरायचे आहेत; परंतु आपण सामनावीर सोडला आहे, हे अविश्वसनीय आहे. ज्याने २० पैकी आठ बळी घेतले.’
ते पुढे बोलताना म्हणाले की, ‘तुमच्याकडे आणखी दोन फिरकीपटू संघात होते. त्यापैकी एकाला नक्कीच बाहेर करता आले असते; पण आज ज्या पद्धतीने खेळपट्टी दिसत आहे, त्यावरून आठ गडी बाद करणारा गोलंदाज खेळायला हवा होता, असे माझे मत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने यावर आणखी प्रकाश टाकावा.’
कुलदीप बळीचा बकरा का?
कुलदीपसोबत असे वारंवार का घडते? कुलदीपसोबत जे घडले त्याचे दु:ख वाटते. हा निर्णय मूर्खपणाचा आणि क्रिकेटच्या तत्त्वांविरुद्ध म्हणावा लागेल. थिंक टॅंकने अधिक संयमाने संघ निवड करायला हवी. मागच्या वेळी नाबाद ३०३ धावा ठोकणाऱ्या करुण नायरला बाहेर बसवून हैदराबादच्या अतिरिक्त वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली होती. आता कुलदीपसोबत हेच घडले. यामुळे स्तब्ध झालो.
डोडा गणेश,
माजी कसोटी गोलंदाज
कुलदीपला बाहेर करण्याचा हा वेगळाच प्रकार आहे. केवळ तीन दिवसांआधी कुलदीप कसोटीत सर्वोत्कृष्ट खेळाडू होता. त्याला बाहेरचा रस्ता दाखवून तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून उनाडकटला संधी देण्यात आली. हे आश्चर्यकारक आहे. याला रणनीतीचा भाग म्हणायचे काय?
अंजुम चोप्रा,
माजी कर्णधार
कुलदीपला ११३ पैकी नऊ कसोटीत संधी
कुलदीपने २०१३ ला कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो ११३ कसोटी सामने खेळला. त्यापैकी केवळ नऊ सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली. इतकेच नव्हे, तर मर्यादित षटकांच्या सामन्यातही कुलदीपला सापत्न वागणूक मिळाली. तो १०८ वन-डे खेळला आहे. त्यापैकी ७३ सामन्यांत त्याला संधी देण्यात आली. टी-२० प्रकारात कुलदीप ९ जुलै २०१७ ला पहिला सामना खेळला. तेव्हापासून भारताने १०३ सामने खेळले, तर कुलदीपला केवळ २५ सामन्यांत संधी मिळू शकली.
Web Title: ind vs ban test live Dropping match winner Kuldeep Yadav is unbelievable Sunil Gavaskar criticizes
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.