ind vs ban 2nd test : भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करुन विजयी सलामी दिली. टीम इंडियाने आपले वर्चस्व कायम राखत बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. सलामीच्या कसोटी सामन्यातील चारही दिवस यजमान भारताचा दबदबा पाहायला मिळाला. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी अष्टपैलू खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पहिल्या डावात भारत अडचणीत असताना अश्विनने शतक तर जड्डूने शानदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कमाल केली. खरे तर बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात अवघ्या १४९ धावा केल्याने भारताला मजबूत आघाडी मिळाली. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे विशाल लक्ष्य होते. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सलामीचा सामना चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर झाला. अखेर भारताने तब्बल २८० धावा विजय साकारला. पहिला सामना जिंकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दुसऱ्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली.
विशेष बाब म्हणजे पहिल्या सामन्यासाठी जाहीर केलेला संघच दुसऱ्या सामन्यात असेल असे बीसीसीआयने जाहीर केले. एकूणच नव्या चेहऱ्याला संधी मिळाली नाही किंवा संघातील एकाही शिलेदाराला डच्चू अथवा विश्रांती देण्यात आलेली नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे खेळवला जाईल. २७ सप्टेंबरपासून या सामन्याला सुरुवात होईल.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.