Join us

गौतम गंभीरची रणनीती! Team India चा बॉलिंग कोच बनणार त्याचाच 'भिडू', वाचा सविस्तर

ind vs ban test series : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 17:09 IST

Open in App

Team India : भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, तिथे ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून टीम इंडियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. ट्वेंटी-२० मालिका संपताच वन डे मालिकेचा थरार रंगेल. या मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिकेत आपले वर्चस्व कायम ठेवले. आगामी वन डे मालिकेसाठी रोहित आणि विराट श्रीलंकेला गेले असल्याचे कळते. भारताचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वातील ही पहिली मालिका आहे. सप्टेंबर महिन्यात टीम इंडिया मायदेशात बांगलादेशविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतून मोहम्मद शमीची संघात एन्ट्री होईल, असे मुख्य निवडकर्ता अजित आगरकरने स्पष्ट केले आहे. अशातच गंभीरची टीम अर्थात फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज मॉर्ने मॉर्केल गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोचिंग स्टाफमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. त्याचा संघातील सहभाग सप्टेंबरमध्ये सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून अपेक्षित आहे. मॉर्केल आयपीएलमध्ये केकेआरकडूनही खेळला आहे. त्याला गंभीरचा जवळचा सहकारी मानले जाते. 

श्रीलंका दौऱ्यानंतर कोचिंग स्टाफचे चित्र स्पष्ट होईल असे गंभीरने सांगितले होते. फिरकी गोलंदाजीमध्ये पारंगत असलेले आणि सध्या अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले साईराज बहुतुले कायम राहणार की नाही हे अनिश्चित आहे. मॉर्केल हा वेगवान गोलंदाजी तज्ज्ञ आहे. याशिवाय तो फिरकीपटूंनाही मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे तो भारताच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करताना दिसणार का हे पाहण्याजोगे असेल.

भारताचा वन डे संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा. 

वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७  ऑगस्ट - दुपारी २.३० वा.

टॅग्स :गौतम गंभीरभारत विरुद्ध बांगलादेशभारतीय क्रिकेट संघ