नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. वन डे मालिका पार पडल्यानंतर आता ब्ल्यू आर्मी लोकेश राहुलच्या नेतृत्वात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. खरं तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे. आगामी मालिकेसाठी संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र रिषभ पंतला वगळून 35 वर्षीय पुजाराकडे उपकर्णधारपद का सोपवले या प्रश्नावर कर्णधार राहुलने शानदार उत्तर देऊन सर्वांची मनं जिंकली आहेत.
सामन्याच्या दोन दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुलने म्हटले, "निदान मला तरी कळत नाही की असे करण्याचा काय उद्देश आहे, ज्याला कोणाला निवडले जाते त्याच्यावर तुम्ही प्रश्न उपस्थित करत असता. मला जेव्हाही उपकर्णधार केले तेव्हा मी आनंदी होतो, तुमच्याकडे संघाची जबाबदारी आहे. हे खरोखर फारसे बदलत नाही, प्रत्येकाला त्याची भूमिका आणि जबाबदारी माहित आहे आणि संघ त्यांच्या योगदानाचे किती कौतुक करतो. ऋषभ आणि पुजारा हे दोघेही आमच्यासाठी अप्रतिम खेळाडू आहेत आणि त्यांनी आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. जे आहे ते आहे कोणीही फारसा विचार करत नाही. आम्ही एक संघ म्हणून पुढे जात आहोत."
रोहित संघाबाहेरभारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला वन डे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. तरीदेखील रोहितने भारताच्या डावात नवव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. त्या सामन्यात रोहितने 29 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. मात्र रोहितची झुंज अयशस्वी ठरली आणि यजमान बांगलादेशच्या संघाने सामन्यासह मालिकेवर कब्जा केला. रोहितला दुखापतीमुळे आगामी कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.
बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ लोकेश राहुल (कर्णधार), शुबमन गिल, अभिमन्यू ईश्वरन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सौरभ कुमार, ऋषभ पंत, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमेश यादव, नवदीप सैनी.
भारत विरूद्ध बांगलादेश कसोटी मालिका
- 14-18 डिसेंबर - पहिला कसोटी सामना, चटगाव
- 22-26 डिसेंबर - दुसरा कसोटी सामना, ढाका
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"