ढाका - भारतीय संघ ४ डिसेंबरपासून बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाका येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल झाला आहे. मात्र ही मालिका भारतीय संघातील दोन खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर त्यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही तर त्यांचं संघातील स्थान धोक्यात येऊ शकतं. त्यातच पुढच्या वर्षी वर्ल्डकप असल्याने या खेळाडूंसाठी ही मालिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन आणि विकेटकिपर रिषभ पंत यांच्यावर सर्वाची नजर असणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान शिखर धवनसमोर आहे. त्याचं कारण म्हणजे भारतीय संघामध्ये सलामीसाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू आहे. शिखर धवन सध्या ३६ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याची कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे सलामीसाठी स्वतः ला सिद्ध करण्याचे आव्हान धवनसमोर आहे.
स्फोटक फलंदाज रिषभ पंतची गेल्या काही काळातील कामगिरी निराशाजनक झालेली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तिन्ही सामन्यात पंतला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला केवळ २५ धावाच काढता आल्या.त्यामुळे आता बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत रिषभ पंतला चांगली कामगिरी करावी लागेल.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ४ डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दुसरा सामना ७ डिसेंबर आणि तिसरा सामना १० डिसेंबर रोजी खेळवला जाईल.