अॅडलेड - सलग दोन सामने जिंकून टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकपमध्ये जोरदार सुरुवात केली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी झालेल्या पराभवाने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आता भारतीय संघ आपला चौथा सामना २ नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने फिरकीपटू युझवेंद्र चहलला एकाही सामन्यात खेळवलेले नाही. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी चहल हा फिरकीपटू म्हणून संघाच खेळण्याचा मोठा दावेदार होता. मात्र त्याला संधी मिळू शकलेली नाही. आता बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या लढतीत युझवेंद्र चहलला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंतच्या पहिल्या तीन सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान दिले होते. मात्र, अश्विनला या संधीचा फायदा उठवता आलेला नाही. काल झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मार्क्रम आणि मिलरने त्याच्या गोलंदाजीची धुलाई केली होती. अश्विनने या सामन्यात चार षटकांत ४३ धावा देऊन एक बळी मिळवला होता. त्यामुळे पुढच्या सामन्यांमध्ये अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला संघात स्थान मिळू शकते.
युझवेंद्र चहलने भारताकडून ६९ टी-२० सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ८.१२ च्या इकॉनमी रेटसह ८५ बळी टिपले आहेत. युझवेंद्र चहल हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.