भारत बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशीच्या खेळात विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्यात गडबड घोटाळा वाला सीन पाहायला मिळाला. दोघांच्यातील ताळमेळाच्या अभावामुळे विराट कोहलीनं आपली विकेट जवळपास गमावली होती. पण बांगलादेशी खेळाडू चुकला अन् भारताच्या ताफ्यातील या जोडीमध्ये गोडी गुलाबीचा क्षण पाहायला मिळाला. कानपूर कसोटी सामन्यात विराट कोहलीनं चांगली फटकेबाजी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. पण त्याने या सामन्यात आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मैलाचा पल्ला पार केला. कसोटी, वनडे आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात त्याने २७ हजार धावांचा टप्पा गाठला आहे.
विराटच्या खेळी बहरण्यात बांगलादेशी खेळाडूचा वाटा
कानपूरच्या कसोटी सामन्यात किंग कहोलीची खेळी बहरण्यात बांगलादेशी खेळाडूनंही हातभार लावल्याचा सीन पाहायला मिळाला. विराट कोहली एकेरी धाव चोरण्यासाठी जवळपास निम्म्या क्रिजमध्ये आला होता. चेंडू बॉलरच्या हातात होता. ते बघून कोहली जाग्यवरच थांबला. पण तरीही त्याला रन आउट करायला बांगलादेशी खेळाडू चुकला. जी गोष्ट अगदी सोपी होती ती त्याने थ्रो मारण्याच्या नादत बिघडवली. ज्याचा विराटला फायदा मिळाला.
थ्रो मारला अन् फसलेला विराट वाचला
भारतीय संघाच्या पहिल्या डावातील १९ व्या षटकात विराट कोहली आणि रिषभ पंत ही जोडी मैदानात होती. बांगलादेशच्या संघाकडून खालेद अहमद (Khaled Ahmed t) गोलंदाजी करत होता. त्याने आपल्या या षटकातील पहिला चेंडू पंतला टाकला. जो अंपायरने नो बॉल घोषित केला. यावर पंतनं एक धाव काढत स्ट्राइक विराटला दिले. त्यानंतर विराट कोहली आणि पंत यांच्यात ताळमेळाचा अभाव दिसला. चोरटी धाव घेण्याच्या नादात विराटनं आपली विकेट जवळपास गमावली होती. पण खालेद अहमदनं सोपी गोष्ट अवघड केली. त्याने डायरेक्ट थ्रो मारला अन् त्याचा नेम चुकला. ज्यामुळे रन आउटच्या जाळ्यात फसलेला विराट वाचला.
पंतनं जादूची झप्पी देत मागितली माफी
रन आउटच्या जाळ्यातून विराट कोहलीची सुटका झाल्यावर नॉन स्ट्राइकला असलेल्या पंतनंही सुटकेचा निश्वास टाकला. त्याने कोहलीला जादूची झप्पी देत माफीही मागितली. विराट ३ चेंडूत २ धावांवर खेळत असताना त्याला हे जीवदान मिळाले. ज्याचा फायदा उठवत त्याने ३५ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच चार खणखणीत चौकारांसह एक उत्तुंग षटकारही पाहायला मिळाला.