भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयासह शानदार सुरुवात केली भारतीय संघ आज बांगलादेशच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय करणार नाही. विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमने-सामने आले असून भारताने तीनवेळा तर बांगलादेशने एकदा बाजी मारली आहे.
ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व पाकिस्तान या तीन संघांविरुद्ध भारताने सर्वच क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली. दुसरीकडे बांगलादेशने तीनपैकी केवळ एक सामना जिंकला. अफगाणिस्तानला नमवल्यानंतर बांगलादेशचा इंग्लंड आणि न्यूझीलंकडून पराभव झाला. सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अनिवार्य आहे. कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीतून सावरला आहे. हीच बांगलादेशसाठी आनंदाची बाब आहे. लिट्टन दास, मेहदी हसन मिराज यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे.
बुधवारी संध्याकाळी पुणे शहरातील काही भागात पाऊस पडल्याने या लढतीवरही पावसाचे सावट आहे. हवामान विभागानुसार गुरुवारी पुण्यात पावसाची शक्यता नाही. मात्र बुधवारच्या पावसामुळे सामन्याच्या दिवशीही काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला लागला आहे.
खेळपट्टीचे स्वरूप
एमसीए स्टेडियमची खेळपट्टी दिवसा फलंदाजांना साथ देते. तर संध्याकाळी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे येथे धावांचा पाठलाग करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. आतापर्यंत झालेल्या सातपैकी पाच सामन्यांमध्ये पहिल्या डावात ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत, तर केवळ दोनवेळा धावांचा पाठलाग यशस्वी ठरला आहे. भारताने येथे सातपैकी चार सामने जिंकले आहेत.
प्रतिस्पर्धी संघ-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, विराट कोहली, शुभमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
बांगलादेश: शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजिद हसन तमीम, नजमुल हसन शान्टो, तौहीद हृदय, मुशफिकुर रहीम, महमदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, नासुम अहमद, महेदी हसन, तास्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकीब.