भारतीय क्रिकेट संघ जवळपास महिन्याभराच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. १९ सप्टेंबरपासून बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडिया पुन्हा मैदानात दिसणार आहे. शेजारील पाहुण्यांसोबत भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिके खेळणार आहे.
पंतच कमबॅक; या दोघांनीही साधला डाव
बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतून रिषभ पंत मोठ्या कालावधीनंतर कसोटीत कमबॅक करतोय. २०२२ मध्ये शेवटचा कसोटी सामना त्याने बांगलादेश विरुद्धच खेळला होता. जलद गोलंदाजीमध्ये यश दयालची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली आहे. दुलिप करंडक स्पर्धेतील अखेरच्या डावात दमदार खेळीच्या जोरावर सर्फराज खान आणि केएल राहुलनं संघात स्थान मिळवलं आहे.
बुमराहच्या नावासमोर उप कर्णधार असा उल्लेख नसण्याचा अर्थ काय लावायचा?
भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे. याआधी भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध जो कसोटी सामना खेळला होतो त्यात बुमराह टीम इंडियाचा उप कॅप्टन होता. त्यामुळे बांगलादेश विरुद्धच्या कसोटीतही तो उप कॅप्टनच्या रुपातच संघात दिसेल, अशी अपेक्षा होती. पण बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जो संघ जाहीर करण्यात आला आहे त्यात उप कॅप्टनची जबाबदारी कुणाकडेही सोपवल्याचे दिसत नाही. ही गोष्ट बुमराहच टीम इंडियातील वजन कमी झालं आहे, असं चित्र निर्माण करणारी आहे. बुमराहनं कॅप्टन्सीवर केली होती 'मन की बात'
रोहित शर्मानं टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. त्यासाठी बुमराहचा विचार व्हायला हवा होता, अशी चर्चाही झाली. त्यावेळी बुमराहनं कॅप्टन्सीबद्दल वक्तव्यही केले होते. वसीम अक्रम, कपिल देव आणि पॅट कमिन्सच उदाहरण देत जलदगती गोलंदाज उत्तम कॅप्टन होऊ शकतात, असे मत बुमराहनं व्यक्त केले होते. ही गोष्ट तो कॅप्टन्सीसाठी तयार असल्याचे संकेत देणारी आहे. पण सध्याच्या घडीला बुमराह या शर्यतीतून खूप लांब असल्याचे दिसून येत आहे.