आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये या आठवड्यात दोन धक्कादायक निकाल नोंदवले गेले आहेत. त्यात अफगाणिस्तानने इंग्लंडला तर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. आता आज भारतीय संघाची गाठ बांगलादेशशी पडणार आहे. बांगलादेशच्या संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा धक्का दिलेला असल्याने आजच्या सामन्यामध्येही बांगलादेश टीम इंडियाला धक्का देऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विराट कोहलीने भारतीय संघाला खबरदारीचा इशारा दिला आहे. विराट कोहलीनं सांगितलं की, या विश्वचषक स्पर्धेमध्ये कुठलाही मोठा संघ नाही आहे, तसेच जेव्हा अधिक यशस्वी संघाची चर्चा केली जाते. तेव्हा उलथापालथ होण्याची शक्यता अधिक वाढते.
आज बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी विराट कोहलीनं सांगितलं की, ‘वर्ल्डकपमध्ये कुठलाही मोठा संघ नाही आहे. जेव्हा तुम्ही केवळ अधिक यशस्वी संघांवर लक्ष देणं सुरू करता, तेव्हा धक्कादायक निकाल समोर येतात’. बांगलादेशच्या संघानं २००७ मध्ये भारताला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र त्यानंतर मागच्या सलग तीन विश्वचषकांमध्ये भारताने बांगलादेशला पराभूत केले आहे.
विराट कोहलीने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनबाबत सांगितलं की, गेल्या काही वर्षांमध्ये मी त्याच्याविरोधात खूप खेळलो आहे. त्याच्याजवळ जबरदस्त कंट्रोल आहे. तो खूप अनुभवी गोलंदाज आहे. तो नव्या चेंडूसह खूप चांगली गोलंदाजी करतो. तो फलंदाजांना चकवा देण्यात माहीर आहे. तसेच तो अचूक मारा करतो. दरम्यान, शाकिब अल हसनने सांगितले की, विराट कोहली सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे. तो खास आहे. तसेच मी त्याला पाच वेळा बाद केलंय. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तसेच कोहलीचा बळी मिळवल्यावर आनंद वाटतो.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने पहिले तिन्ही सामने जिंकत दणक्यात सुरुवात केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघांवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशने तीनपैकी केवळ एकच सामना जिंकला असून, त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले आहे.