नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2022 च्या 35व्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊले टाकली आहेत. मात्र पाऊस आणि बांगलादेशने भारतीय चाहत्यांचे हृदयाचे ठोके वाढवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. भारतासाठी विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला, त्याने 44 चेंडूत नाबाद 64 धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारून बांगलादेशला पराभवाची धूळ चारली.
या सामन्यात बांगलादेशच्या पराभवानंतर संघाचा शाकिब अल हसन पुन्हा एकदा आक्रमक झाला. त्याने भारतीय संघाविरूद्ध केलेल्या विधानाचा भारताच्या माजी खेळाडूने चांगलाच समाचार घेतला. यावेळी भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने शाकिबला त्याच्या वक्तव्यावर फटकारले आहे. या सामन्यापूर्वी शाकिबने आपण येथे विश्वचषक जिंकण्यासाठी आलो नसल्याचे विधान केले होते आणि बांगलादेशने भारताला हरवले तर ते अपसेट होईल, असे अजब विधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते.
सेहवागने साधला निशाणा
आता भारताविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर शाकिबच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सेहवागने क्रिकबझशी संवाद साधताना म्हटले, "कर्णधाराने या गोष्टीची जबाबदारी घेतली पाहिजे. कालच्या सामन्यात त्याच्याआधी शांतो बाद झाला, त्यानंतर शाकिबही त्याच षटकात बाद झाला. त्यामुळे तिथेच मोठी चूक झाली. 99/3, 100/4, 102/5 अशा धावसंख्येवर जे गडी बाद झाले होते अशा स्थितीत एका भागीदारीची गरज होती. असे नाही की तुम्हाला टी-20 मध्ये 50 धावांची भागीदारी आवश्यक आहे. 10 चेंडूत 20 धावांची भागीदारीही सामन्याला कलाटणी देऊ शकते."
आम्ही जेव्हाही भारतासोबत खेळतो तेव्हा असेच घडते. अर्थात आमचा भारताविरूद्धचा सामना अटीतटीचा होतो पण आम्हाला विजयाची सीमारेषा ओलांडता येत नाही, असे शाकिबने सामना गमावल्यानंतर म्हटले होते. "मला वाटते की चूक झाली आहे, अगदी कर्णधाराकडूनही. तो कर्णधार आहे, त्याच्याकडे फारसा अनुभव आहे, जबाबदारी घ्यायला हवी होती आणि कोहली खेळतो तसा त्याने शेवटपर्यंत खेळायला हवे होते. संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढायला हवे किंवा अशी वादग्रस्त विधाने करू नये", अशा शब्दांत सेहवागने शाकिबचा समाचार घेतला.
Web Title: IND vs BAN Virender Sehwag says Shakib Al Hasan should play till the end like Virat Kohli and then make such statements
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.