लोकेश राहुलनं देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील दुलिप करंडक स्पर्धेत मोक्याच्या क्षणी चमकदार कामगिरी करत टीम इंडियात एन्ट्री मारली आहे. त्याला अगदी स्पष्ट संदेश देऊनच ही संधी दिली आहे. खुद्द रोहित शर्मानंच त्याच्या निवडीबद्दलची पडद्यामागची गोष्ट शेअर केली आहे.
आमच्याकडून त्याला स्पष्ट संदेश
बांगलादेश विरुद्धच्या मालिकेआधी रोहित शर्मानं मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी लोकेश राहुल संदर्भातील तो म्हणाला की, मला वाटते लोकेश राहुलच्या क्षमतेबद्दल तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. आमच्याकडून त्याला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. त्याने सर्व सामन्यात खेळावे, असे आम्हाला वाटते. त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी, असे आम्हाला वाटते. त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. त्याच्याकडून संघ काय अपेक्षा ठेवतो याची त्याला स्पष्ट कल्पना देणे गरजेचे होते. तेच आम्ही केले. असे रोहित याने म्हटले आहे.
लोकेश राहुल पहिली कसोटी खेळणार हे स्पष्ट
रोहित शर्मा याने लोकेश राहुलवरील भरवसा कायम असल्याचे सांगत तो चेन्नईच्या मैदानात पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार हे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर चेन्नईच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरीसह लोकेश राहुल मध्यफळीतील आपलं स्थान पक्के करेल, असा विश्वासही रोहित शर्मानं व्यक्त केला आहे. या दोन गोष्टींमुळे लोकेश राहुल ठरतो एकदम उपयुक्त खेळाडू
जलदगती गोलंदाजीसह फिरकीपटूंविरोधात सर्वोत्तम खेळ करण्याची त्याच्यात क्षमता आहे, या गोष्टीवरही रोहितनं यावेळी भर दिला. हे कौशल्य लोकेश राहुलला घरच्या मैदानासह परदेशी खेळपट्टीवरील उपयुक्त खेळाडू ठरवते, असेही रोहित शर्मानं म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमधील कठीण परिस्थितीत त्याने आपली क्षमता सिद्ध केल्याचा दाखलाही कॅप्टन रोहित शर्माने दिला.
जिथूनं थांबला तिथून पुढे सुरुवात करेल
दक्षिण आफ्रिकेतील सामन्यात त्याने १०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर हैदराबाद कसोटी सामन्यातही त्याच्या भात्यातून ८० धावांची क्लास खेळी पाहायला मिळाली. पण दुर्देवाने तो दुखापतग्रस्त झाला. हैदराबादमध्ये तो जिथं थांबला तिथूनच तो पुढे सुरुवात करेल, असा विश्वास रोहितनं व्यक्त केला आहे.
तो आपली दावेदारी भक्कम करण्याचे चॅलेंज पेलणार का?
लोकेश राहुलनं सेंच्युरियनच्या मैदानात शतकी खेळी केली होती. त्यानंतर हैदराबादच्या मैदानातही त्याच्या भात्यातून दमदार खेळी झाली. पण त्याच्याआधी दोन वर्षे त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता. १२ डावात त्याच्या भात्यातून फक्त एक अर्धशतक पाहायला मिळाले होते. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात क्लास दाखवून तो न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील बॉर्डर गावसकर स्पर्धेसाठी आपली दावेदारी भक्कम करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.