भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयासह शानदार सुरुवात केली भारतीय संघ आज बांगलादेशच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय करणार नाही. विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमने-सामने आले असून भारताने तीनवेळा तर बांगलादेशने एकदा बाजी मारली आहे.
भारतीय संघ बांगलादेशविरुद्धचा आजचा सामना जिंकला तर तो पुन्हा न्यूझीलंडला मागे टाकेल आणि न्यूझीलंड संघासह उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अगदी जवळ येईल. बांगलादेशला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने पुढील २ सामने जिंकले, तर ६ विजयांसह १२ गुणांसह उपांत्य फेरीसाठी मजबूत दावा करेल. मात्र उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला पुढील आणखी ३ सामने जिंकावे लागणार आहेत. मग भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
श्रीलंका वगळता सर्व ९ संघांनी आपले विजयाचे खाते उघडले आहे. यामध्ये अफगाणिस्तानने इंग्लंडचा तर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. पण या विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणि न्यूझीलंडचा प्रवास खूपच छान झाला आहे. न्यूझीलंड संघाने पहिले चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.
बांगलादेशला विजय अनिवार्य
सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अनिवार्य आहे. कर्णधार शाकिब अल हसन दुखापतीतून सावरला आहे. हीच बांगलादेशसाठी आनंदाची बाब आहे. लिट्टन दास, मेहदी हसन मिराज यांनी फलंदाजीत चमक दाखवली आहे.
पावसाचे सावट ?
बुधवारी संध्याकाळी पुणे शहरातील काही भागात पाऊस पडल्याने या लढतीवरही पावसाचे सावट आहे. हवामान विभागानुसार गुरुवारी पुण्यात पावसाची शक्यता नाही. बुधवारच्या पावसामुळे सामन्याच्या दिवशीही काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा जीव टांगणीला लागला आहे.
खेळपट्टीचे स्वरूप
एमसीए स्टेडियमची खेळपट्टी दिवसा फलंदाजांना साथ देते. तर संध्याकाळी गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे येथे धावांचा पाठलाग करणे नेहमीच आव्हानात्मक ठरते. आतापर्यंत झालेल्या सातपैकी पाच सामन्यांमध्ये पहिल्या डावात ३०० पेक्षा अधिक धावा झाल्या आहेत, तर केवळ दोनवेळा धावांचा पाठलाग यशस्वी ठरला आहे. भारताने येथे सातपैकी चार सामने जिंकले आहेत.