भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यानं कानपूर येथील ग्रीन पार्कच्या मैदानात रंगलेल्या बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली. दोन्ही डावात अर्धशतकी करणाऱ्या यशस्वीला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले. जैस्वालनं पहिल्या डावात ५१ चेंडूत ७२ धावांची स्फोटक खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ४५ चेंडूत ५१ धावा चोपल्या. या दमदार कामगिरीसह त्याने भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ७ गडी राखून मिळवलेल्या कसोटी सामन्यात मोलाचा वाटा उचलला.
यशस्वी जैस्वालनं मोडला लिटल मास्टर गावसकरांचा विक्रम
टीम इंडियाच्या या युवा खेळाडूनं कानपूर कसोटी सामन्यात लिटल मास्टर सुनील गावसकर यांचा ५० वर्षांहून अधिककाळ अबाधित असलेला विक्रम मोडीत काढला आहे. गावसकरांनी १९७१ मध्ये २३ वर्षांपेक्षा कमी वयात एका कॅलेंडर ईयरमध्ये ९१८ धावा करण्याचा पराक्रम करून दाखवला होता. दिग्गजाचा हा विक्रम यशस्वी जैस्वालनं मागे टाकला.
युवा सलामीवीरानं यंदाचं वर्ष गाजवलं, एकदम फर्स्टक्लास आहे त्याचा रेकॉर्ड
यंदाचं वर्ष गाजवणाऱ्या युवा सलामीवीरानं बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटीतील सामन्यात २२ वर्षे आणि २७८ दिवस या वयात ९२९ धावांचा आकडा गाठला. यसश्वी जैस्वाल याने २०२४ मध्ये ८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ६६.३५ च्या सरासरीनं ९२९ धावा कुटल्या आहेत. यात दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. सातत्याने तो आपल्यातील धमक दाखवून देताना दिसून येते.
सेहवागच्या क्लबमध्येही मारली एन्ट्री
कानपूर कसोटी सामन्यात युवा क्रिकेटरनं भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागच्या खास क्लबमध्येही एन्ट्री मारली. जैस्वाल हा १०० किंवा त्यापेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं एका दोन अर्धशतके झळकवणारा दुसरा भारतीय ठरला. याआधी सेहवागने अशी कामगिरी करुन दाखवली होती. २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात सेहवागनं ४६ चेंडूत ५६ आणि ५५ चेंडूत ५५ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते.
Web Title: IND vs BAN Yashasvi Jaiswal breaks Sunil Gavaskar's record, equals Virender Sehwag's feat in Kanpur Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.