Hardik Pandya Fan Plaster on leg, Ind vs Eng 1st ODI : भारतीय संघाने टी२० मालिकेपाठोपाठच वनडे मालिकेतही विजयी सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने चार गडी आणि ६८ चेंडू राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाकडून कर्णधार जॉस बटलरने ५२ तर जेकब बेथेलने ५१ धावा करत संघाला २४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल याने ८७, श्रेयस अय्यरने ५९ तर अक्षर पटेलने ५२ धावा करत संघाला सहज सोपा विजय मिळवून दिला. सामन्यात हार्दिक पांड्याच्या धमाकेदार षटकाराची जोरदार चर्चा झाली. त्यासोबतच हार्दिकला पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणीची विशेष चर्चा रंगली.
पायाला प्लास्टर, तरीही हार्दिकसाठी स्टेडियममध्ये...
हार्दिक पांड्याप्रति असलेले प्रेम आणि त्याच्या खेळावर फिदा असलेली २३ वर्षांची यशस्वी वाही हिने सामन्यावेळी धाडसाचा परिचय दिला. डाव्या पायाला गंभीर इजा आणि त्यावर प्लास्टर चढवलेले असताना हार्दिकची एक झलक पाहण्यासाठी ती चक्क स्टेडियमध्ये पोहोचली. 'टेक वॉलनेट' या कंपनीत डेटा इंजिनिअर असलेल्या यशस्वीने सांगितले, "काही दिवसांआधी झालेल्या भीषण अपघातात माझ्या पायाला दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया पार पडली. हार्दिकचा खेळ पाहण्याची मनापासून इच्छा असल्यामुळे मी जखमेची पर्वा न करता येथे पोहोचले. सामन्याचे तिकीट मिळविण्यासाठी मला फार संघर्ष करावा लागला. हार्दिक चांगलाच खेळणार अशी मला आशा होती. सामना जिंकल्याचा आनंद आहे."
![]()
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. मात्र ७५ धावांचा टप्पा ओलांडताच फिल सॉल्ट(४३) आणि बेन डकेट (३२) हे दोन्ही सलामीवीर बाद झाले. दोन वर्षांनी कमबॅक करणारा जो रूट १९ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके ठोकून संघाला १५० पार मजल मारून दिली. तर खालच्या फळीत जोफ्रा आर्चरने २१ धावा करत संघाला २४८ धावांपर्यंत नेले. रवींद्र जाडेजा (३ बळी), हर्षित राणा (३ बळी) आणि इतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव ४७.४ षटकातच संपुष्टात आला.
भारताकडून रोहित शर्मा (२), यशस्वी जैस्वाल (१५) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकले. तो १४ चौकारांसह ८७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत झटपट ५९ धावा कुटल्या. तर अक्षर पटेलने ५२ धावांची संयमित खेळी केली. या तीन अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताचा विजयाचा मार्ग प्रचंड सुकर झाला. अखेरीस हार्दिक पांड्या (नाबाद ९) आणि रविंद्र जाडेजा (नाबाद १२) यांनी ३८.४ षटकांत सामना जिंकवला. शुबमन गिलला सामनावीर निवडण्यात आले.
Web Title: Ind vs Eng 1st ODI Hardik Pandya super fan 23 year old girl yashasvi wahi came to stadium with plaster on leg injured gets attention
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.