Join us

Hardik Pandya Fan, Ind vs Eng 1st ODI : पायाला 'प्लास्टर', तरीही गाठलं स्टेडियम... हार्दिकची 'जबरा फॅन' यशस्वी चर्चेत!

Hardik Pandya Fan, Ind vs Eng 1st ODI : केवळ हार्दिकला पाहण्यासाठी दुखापत विसरून सामन्याला आलेल्या एका तरुणीची विशेष चर्चा रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:08 IST

Open in App

Hardik Pandya Fan Plaster on leg, Ind vs Eng 1st ODI : भारतीय संघाने टी२० मालिकेपाठोपाठच वनडे मालिकेतही विजयी सुरुवात केली. इंग्लंड विरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने चार गडी आणि ६८ चेंडू राखून सहज विजय मिळवला. इंग्लंडच्या संघाकडून कर्णधार जॉस बटलरने ५२ तर जेकब बेथेलने ५१ धावा करत संघाला २४८ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून शुभमन गिल याने ८७, श्रेयस अय्यरने ५९ तर अक्षर पटेलने ५२ धावा करत संघाला सहज सोपा विजय मिळवून दिला. सामन्यात हार्दिक पांड्याच्या धमाकेदार षटकाराची जोरदार चर्चा झाली. त्यासोबतच हार्दिकला पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणीची विशेष चर्चा रंगली.

पायाला प्लास्टर, तरीही हार्दिकसाठी स्टेडियममध्ये...

हार्दिक पांड्याप्रति असलेले प्रेम आणि त्याच्या खेळावर फिदा असलेली २३ वर्षांची यशस्वी वाही हिने सामन्यावेळी धाडसाचा परिचय दिला. डाव्या पायाला गंभीर इजा आणि त्यावर प्लास्टर चढवलेले असताना हार्दिकची एक झलक पाहण्यासाठी ती चक्क स्टेडियमध्ये पोहोचली. 'टेक वॉलनेट' या कंपनीत डेटा इंजिनिअर असलेल्या यशस्वीने सांगितले, "काही दिवसांआधी झालेल्या भीषण अपघातात माझ्या पायाला दुखापत झाली. त्यावर शस्त्रक्रिया पार पडली. हार्दिकचा खेळ पाहण्याची मनापासून इच्छा असल्यामुळे मी जखमेची पर्वा न करता येथे पोहोचले. सामन्याचे तिकीट मिळविण्यासाठी मला फार संघर्ष करावा लागला. हार्दिक चांगलाच खेळणार अशी मला आशा होती. सामना जिंकल्याचा आनंद आहे."

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. मात्र ७५ धावांचा टप्पा ओलांडताच फिल सॉल्ट(४३) आणि बेन डकेट (३२) हे दोन्ही सलामीवीर बाद झाले. दोन वर्षांनी कमबॅक करणारा जो रूट १९ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके ठोकून संघाला १५० पार मजल मारून दिली. तर खालच्या फळीत जोफ्रा आर्चरने २१ धावा करत संघाला २४८ धावांपर्यंत नेले. रवींद्र जाडेजा (३ बळी), हर्षित राणा (३ बळी) आणि इतर गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव ४७.४ षटकातच संपुष्टात आला.

भारताकडून रोहित शर्मा (२), यशस्वी जैस्वाल (१५) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर शुबमन गिलने दमदार अर्धशतक ठोकले. तो १४ चौकारांसह ८७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत झटपट ५९ धावा कुटल्या. तर अक्षर पटेलने ५२ धावांची संयमित खेळी केली. या तीन अर्धशतकी खेळींच्या जोरावर भारताचा विजयाचा मार्ग प्रचंड सुकर झाला. अखेरीस हार्दिक पांड्या (नाबाद ९) आणि रविंद्र जाडेजा (नाबाद १२) यांनी ३८.४ षटकांत सामना जिंकवला. शुबमन गिलला सामनावीर निवडण्यात आले.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५हार्दिक पांड्याशुभमन गिलरवींद्र जडेजाश्रेयस अय्यर