India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) आज इंग्लंडच्या संघाला मुळापासून हादरवून सोडले. पहिल्याच स्पेलमध्ये ५ षटकांत ४ विकेट्स घेत बुमराहने भारताला मजबूत पकड मिळवून दिली. त्यानंतर मोहम्मद शमीने पुढची जबाबदारी चोख पार पाडली. बुमराहने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये सर्वोत्तम गोलंदाजीचा भारतीचा विक्रम नोंदवला. भारताने १११ धावांचे लक्ष्य सहज पार केले. रोहित शर्मा व शिखर धवन या अनुभवी जोडीने विक्रमांना गवसणी घालताना भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्मा व शिखर धवन ( Rohit Sharma & Shikhar Dhawan) या जोडीने इंग्लंडला झोडून काढले. रोहितने त्याचे फेव्हरिट पुल शॉट मारताना तीन खणखणीत षटकार खेचले. भारताकडून सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या दोघांनंतर वन डेत सलामीला ५०००+ धावा करणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली. सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर यांनी ६६०९ धावा, अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन यांनी ५३७२ धावा, गॉर्डन ग्रिनीज-डी हायनेस यांनी ५१५० धावा केल्या आहेत.
रोहितने वन डेतील ४५ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शिखरने त्याला उत्तम साथ दिली. रोहित-धवन या जोडीने १९ षटकांत हा सामना संपवला. रोहितने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७६ धावा केल्या, तर धवनने ३१ धावा करताना भारताला १० विकेट्स व १८८ चेंडू राखून विजय मिळवून दिला. भारताचा हा चेंडूंच्या बाबतीत तिसरा मोठा विजय ठरला. यापूर्वी २००१मध्ये केनियाविरुद्ध २३१ चेंडू व २०१८मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २११ चेंडू राखून भारताने विजय मिळवला होता.
जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. जसप्रीतने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ११० धावांत तंबूत पाठवला. भारताविरुद्ध आता ११० ही इंग्लंडची निचांक धावसंख्या आहे. भारताविरुद्धही इंग्लंडची ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. मोहम्मद शमीने तीन, तर प्रसिद्ध कृष्णाने एक विकेट घेतली. जेसन रॉय ( ५ चेंडू), जो रूट ( २ चेंडू), बेन स्टोक्स ( १ चेंडू), लिएम लिव्हिंगस्टोन ( ८ चेंडू) हे शून्यावर बाद झाले. इंग्लंडकडून जोस बटलर ( ३०), डेव्हिड विली ( २१) यांनी चांगला खेळ केला. बुमराहने ६ विकेट्स घेताना इंग्लंडमध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवचा ( ६-२५) विक्रम मोडला.