India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली... दुसऱ्या षटकात बुमराहने दोन धक्के देत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरवला. त्यानंतर मोहम्मद शमीने डेंजर बेन स्टोक्सला माघारी पाठवले. बुमराहचे धक्का तंत्र येथेच थांबले नाही, तर त्याने जॉनी बेअरस्टोची विकेट घेत इंग्लंडची अवस्था ४ बाद १७ अशी केली. बुमराहने तीन षटकांत ६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. यष्टिरक्षक रिषभ पंतने ( Rishabh Pant) दोन अफलातून झेल घेतले. जॉनी बेअरस्टोची कॅच ही पाहण्यासारखी होती.
भारत-इंग्लंड यांच्यातील वन डे सामन्यांतील जय-पराजयाची आकडेवारी ही ५५-४३ अशी टीम इंडियाच्या बाजूने आहे. ओव्हल येथे झालेल्या मागील १० वन डे सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना २९१ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले. रोहित व शिखर सलामीला येतील, त्यानंतर श्रेयस, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा असा संघ आहे.
मोहम्मद शमीचे पहिले षटक सावध खेळून ६ धावा केल्यानंतर जेसन रॉय दुसऱ्या षटकात बुमराहच्या माऱ्याचा सामना करण्यासाठी उभा राहिला. पहिली तीन चेंडू चाचपडत खेळताना बाहेर जाणारा चौथा चेंडू छेडण्याचा मोह रॉय आवरू शकला नाही. बॅटची किनार घेत चेंडू स्टम्प्सवर आदळला अन् पाच चेंडूंत एकही धाव न करता रॉय माघारी परतला. त्यानंतर एक चेंडूच्या अंतराने बुमराहने जो रूटला बाद केले. अप्रतिम बाऊन्सर टाकून बुमराहने यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी रूटला भोपळ्यावर बाद केले. पुढील षटकात शमीने बेन स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद ७ अशी केली. त्यानंतर जॉनी बेअरस्टोला ( ७) झेलबाद करून बुमराहने चौथा धक्का दिला. त्यानंतर बुमराहने पाचवा धक्का देताना लिएम लिव्हिंगस्टोनचा त्रिफळा उडवला.