India vs England 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) इंग्लंड कंडीशनचा पुरेपूर फायदा उचलताना यजमानांना धक्क्यांवर धक्के दिले. त्याने १९ धावांत ६ विकेट्स घेताना इंग्लंडचा संपूर्ण संघ ११० धावांत तंबूत पाठवला. भन्नाट यॉर्कर अन् स्विंग करणाऱ्या चेंडूवर बुमराहने इंग्लंडच्या स्टार खेळाडूंचे 'ग्रह' बिघडवले. या सामन्यात इंग्लंडचे ४ फलंदाज भोपळा न फोडताच मैदानातून परतले. त्याच 'Duck' कामगिरीवरून बुमराहची पत्नी संजना गणेसन ( Sanjana Ganesan) हिने इंग्लंडला ट्रोल केले. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. जसप्रीतने सहा विकेट्स घेताना इंग्लंडमध्ये भारतीय गोलंदाजाकडून सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीची नोंद केली. यापूर्वी कुलदीप यादवने २५ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. वन डे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर इंग्लंडचे चार फलंदाज एकाच डावात शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. १९७९ साली लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना भोपळा फोडू दिला नव्हता. त्याआधी ऑस्ट्रेलियाने १९७७मध्ये बर्मिंगहॅम येथे चौघांना शून्यावर बाद केले होते आणि त्यानंतर आज भारताने कमाल करून दाखवली. आजच्या सामन्यात जेसन रॉय ( ५ चेंडू), जो रूट ( २ चेंडू), बेन स्टोक्स ( १ चेंडू), लिएम लिव्हिंगस्टोन ( ८ चेंडू) हे शून्यावर बाद झाले.
याच वरून संजनाने इंग्लंडला ट्रोल केले. ऐका ती काय म्हणाली. भारतीय गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्मा व शिखर धवन या जोडीने इंग्लंडला झोडून काढले. रोहितने वन डेतील ४५ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शिखरने त्याला उत्तम साथ दिली. रोहित-धवन या जोडीने १८.४ षटकांत हा सामना संपवला. रोहितने ५८ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ७६ धावा केल्या, तर धवनने ३१ धावा करताना भारताला १० विकेट्स व १८८ चेंडू राखून विजय मिळवून दिला. भारताने पहिल्यांदाच इंग्लंडवर १० विकेट्स राखून विजय मिळवला आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील १४ सामन्यांतील हा १२वा विजय ठरला. रोहित व धवन यांनी वन डेत १८ वेळा शतकी भागीदारी केली आहे.
या सामन्यात रोहितने ५ षटकार खेचून एक मोठा विक्रम केला. वन डे क्रिकेटमध्ये त्याने २५० षटकार पूर्ण केले आणि हा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. शाहिद आफ्रिदी ( ३५१), ख्रिस गेल ( ३३१), सनथ जयसूर्या ( २७०) यांच्यानंतर रोहितचा ( २५०) क्रमांक येतो. महेंद्रसिंग धोनी २२९ षटकारांसह पाचव्या क्रमांकावर आहे.