Join us  

Jasprit Bumrah, IND vs ENG 1st ODI Live Updates : जसप्रीत बुमराहने ३ चेंडूंत २ फलंदाजांना माघारी पाठवले; इंग्लंडचे तीन गडी ७ धावांवर बाद झाले

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी तो यशस्वी ठरवला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 5:56 PM

Open in App

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी तो यशस्वी ठरवला. प्रतिस्पर्धी गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई करणाऱ्या जेसन रॉयची बॅट भारतीयांसमोर थंड पडली. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) दुसऱ्याच षटकात एकही धाव न देता इंग्लंडच्या दोन तगड्या फलंदाजांना माघारी पाठवले. त्यानंतर तिसऱ्या षटकात मोहम्मद शमीने धक्का देताना इंग्लंडची अवस्था ३ बाद ७ धावा अशी केली.  भारत-इंग्लंड यांच्यातील वन डे सामन्यांतील जय-पराजयाची आकडेवारी ही ५५-४३ अशी टीम इंडियाच्या बाजूने आहे. ओव्हल येथे झालेल्या मागील १० वन डे सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना २९१ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार असल्याचे रोहितने स्पष्ट केले. रोहित व शिखर सलामीला येतील, त्यानंतर श्रेयस, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल व प्रसिद्ध कृष्णा असा संघ आहे.  

मोहम्मद शमीचे पहिले षटक सावध खेळून ६ धावा केल्यानंतर जेसन रॉय दुसऱ्या षटकात बुमराहच्या माऱ्याचा सामना करण्यासाठी उभा राहिला. पहिली तीन चेंडू चाचपडत खेळताना बाहेर जाणारा चौथा चेंडू छेडण्याचा मोह रॉय आवरू शकला नाही. बॅटची किनार घेत चेंडू स्टम्प्सवर आदळला अन् पाच चेंडूंत एकही धाव न करता रॉय माघारी परतला. त्यानंतर एक चेंडूच्या अंतराने बुमराहने जो रूटला बाद केले. अप्रतिम बाऊन्सर टाकून बुमराहने यष्टिरक्षक रिषभ पंतकरवी रूटला भोपळ्यावर बाद केले. पुढील षटकात शमीने बेन स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवून इंग्लंडची अवस्था ३ बाद ७ अशी केली.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहमोहम्मद शामीबेन स्टोक्स
Open in App