India vs England 1st T20 I Live Updates : भारताने समोर ठेवलेल्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) टाकलेल्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ( Jos Buttler) याचा त्रिफळा उडवला. अर्षदीप सिंगने पदार्पणात आत्मविश्वासाने गोलंदाजी केली. फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर हार्दिकने गोलंदाजीतही इंग्लंडला धक्का दिला. त्यांचे दोन फलंदाज २७ धावांवर माघारी परतले.
मैदानावर या अन् झोडायला सुरूवात करा... हाच पवित्रा घेत भारतीय फलंदाज मैदानावर उतरले. कोरोनातून सावरल्यानंतर मैदानावर उतरलेल्या रोहित शर्माने ( २४) दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर दीपक हुडा ( ३३) , सूर्यकुमार यादव ( ३९) यांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५१ धावा करताना ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक झळकावले. रोहितने या सामन्यात आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा ओलांडला. कर्णधार म्हणून भारतासाठी ट्वेंटी-२०त विराट कोहलीने १५७० धावा, महेंद्रसिंग धोनीने १११२ धावा आणि रोहितने १०११ धावा केल्या आहेत.
दीपक व सूर्यकुमार यांनी मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. हार्दिकने भारताच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. पण, पुन्हा एकदा दिनेश कार्तिकच्या ( ११) आधी अक्षर पटेलला ( १७ ) पाठवण्याच्या निर्णयावर टीका होताना दिसतेय. भारताला अखेरच्या ५ षटकांत ४१ धावा करता आल्या आणि ४ विकेट्स गमावल्या. भारताने ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली ( २-२६) व ख्रिस जॉर्डन ( २-२३) यांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. पदार्पणवीर अर्षदीप सिंगनेही पहिले आंतरराष्ट्रीय षटक निर्धाव फेकून इंग्लंडवर दडपण निर्माण केले.
Web Title: IND vs ENG 1st T20 I Live Updates : Bhuvneshwar Kumar gets the big wicket, Jos Buttler gone for duck, England 2/27, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.