India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड पहिली ट्वेंटी-२० हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) गाजवलेली पाहायला मिळतेय. ५१ धावांच्या खेळीनंतर हार्दिकने गोलंदाजीतही कमाल करताना ७ चेंडूंत इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची विकेट घेत भारताची सामन्यावरील पकड मजबूत केली. भारताने समोर ठेवलेल्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) टाकलेल्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ( Jos Buttler) याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर हार्दिकची गाडी सुसाट पळाली...
रोहित शर्माने ( २४) दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर दीपक हुडा ( ३३) , सूर्यकुमार यादव ( ३९) यांनीही इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५१ धावा करताना ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक झळकावले. दीपक व सूर्यकुमार यांनी मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली. हार्दिकने भारताच्या धावांचा वेग कायम ठेवला होता. पण, पुन्हा एकदा दिनेश कार्तिकच्या ( ११) आधी अक्षर पटेलला ( १७ ) पाठवण्याच्या निर्णयावर टीका होताना दिसतेय. भारताला अखेरच्या ५ षटकांत ४१ धावा करता आल्या आणि ४ विकेट्स गमावल्या. भारताने ८ बाद १९८ धावांपर्यंत मजल मारली. मोईन अली ( २-२६) व ख्रिस जॉर्डन ( २-२३) यांनी चांगली गोलंदाजी केली.
प्रत्युत्तरात इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का बसला. भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. पदार्पणवीर अर्षदीप सिंगनेही पहिले आंतरराष्ट्रीय षटक निर्धाव फेकून इंग्लंडवर दडपण निर्माण केले. त्यानंतर पाचव्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर विकेट मिळवून दिली. चेंडू डेवीड मलानच्या ( २१) बॅटला लागून यष्टिंवर आदळला. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लिएम लिव्हिंगस्टोनला ( ०) बाद करून इंग्लंडला मोठा धक्का दिला. हे कमी होते की काय ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने जेसन रॉय ( ४) याची महत्त्वाची विकेट मिळवून दिली आणि इंग्लंडची अवस्था ४ बाद ३३ अशी केली.
Web Title: IND vs ENG 1st T20 I Live Updates : Dawid Malan, Liam Livingstone, Jason Roy; Hardik Pandya has a third wicket! England 33-4, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.