India vs England 1st T20 I Live Updates : आजचा दिवस हा हार्दिक पांड्याचाच ( Hardik Pandya) होता... भारत-इंग्लंड पहिली ट्वेंटी-२० हार्दिकने ५१ धावांच्या खेळीनंतर ४ विकेट्स घेतल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीसमोर इंग्लंडचा बँड वाजला अन् भारताने हा सामना जिंकून मालिकेत १-०अशी आघाडी घेतली. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करून जेतेपद जिंकून देत टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या हार्दिकचा खेळ दिवसेंदिवस बहरताना दिसतोय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील परदेशातील पहिल्याच सामन्यात हार्दिकने छाप सोडली. आजच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना हार्दिकने आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम नावावर केला.
१९८ धावांच्या प्रत्युत्तरात पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा भोपळ्यावर त्रिफळा उडवला. हार्दिक पांड्या त्याच्या पहिल्याच षटकात डेवीड मलान ( २१) व लिएम लिव्हिंगस्टोन ( ०) यांची विकेट घेतली. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने जेसन रॉय ( ४) यालाही माघारी पाठवले. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने इंग्लंडच्या हॅरी ब्रुकचा सोपा झेल सोडला. युजवेंद्र चहलच्या षटकात सूर्यकुमार यादवने सेट झालेल्या मोईन अलीचा झेल सोडला. ब्रूक व अली ही जोडी चांगलीच टिकताना दिसली. पण, चहलने पुढच्या षटकात ही जोडी तोडली. ब्रूकला ( २८) माघारी पाठवताना इंग्लंडला पाचवा धक्का दिला. ब्रूक व अलीने ३६ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली होती. त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर चहलने आणखी एक विकेट मिळवली. २० चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ३६ धावा करणाऱ्या अलीला दिनेश कार्तिकने स्टम्पिंग केले.
अर्षदीपने पदार्पणातील पहिली विकेट घेताना रिसे टॉपली( ९) याला बाद केले. चहलने ३२ धावांत २ विकेट्स घेतल्या. अर्षदीपने अखेरच्या षटकात मॅट पर्किनसनची विकेट घेत इंग्लंडला १४८ धावांत गुंडाळले. अर्षदीपने १८ धावांत २ विकेट्स घेतल्या. भारताने हा सामना ५० धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.