India vs England 1st T20 I Live Updates : भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. कोरोना झाल्यामुळे पाचव्या कसोटीला मुकणारा रोहित शर्मा ( Rohit Sharma) या सामन्यातून पुनरागमन करत आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पूर्णवेळ हाती घेतल्यानंतर परदेशातील ही रोहितची पहिलीच मालिका आहे. इयॉन मॉर्गनच्या निवृत्तीनंतर इंग्लंडही नवा कर्णधार जोस बटलर याच्या नेतृत्वाखाली प्रथमच खेळणार आहे. त्यामुळे रोहित वि. बटलर हा सामना पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करून या सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
२०१४नंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका हरलेला नाही. २०१७ व २०१८मध्ये भारताने २-१ अशा फरकाने, तर २०२१मध्ये ३-२ अशा फरकाने मालिका जिंकली आहे. २०१४मध्ये भारताला ०-१ अशी हार मानावी लागली, तर २०१२ मध्ये १-१असा बरोबरीचा निकाल लागला होता. भारतीय संघाने पंजाब किंग्सचा गोलंदाज अर्षदीप सिंग याला आज पदार्पणाची संधी दिली आहे. हिटमॅनने स्वतः अर्षदीपला पदार्पणाची कॅप दिली. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्मा व इशान किशन ही मुंबई इंडियन्सची जोडी सलामीला उतरली. रोहितने त्याच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात केली. इतके दिवस क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याचे हात शिवशिवत असल्याचे त्याचे फटके पाहून जाणवत होते. सॅम कुरनच्या पहिल्याच षटकात त्याने ९ धावा चोपल्या. त्यानंतर रिसे टोपलेला फटकावले. जोस बटलर याने तिसऱ्या षटकात मोईन अलीला आणले आणि त्यालाही रोहितने सलग दोन चौकार खेचले.पण, अलीने त्याची विकेट घेतली. १४ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने तो २४ धावा करून बाद झाला.
रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त कर्णधार म्हणून १००० धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीने ३० डावांमध्ये १०००+ धावा केल्या होत्या आणि रोहितने आज ( २९ डाव) तो विक्रम मोडला. सर्वाधिक जलद १००० धावा करणाऱ्या कर्णधारांमध्ये पाकिस्तानचा बाबर आजम ( २६ डाव) अव्वल क्रमांकावर आहे. रोहित दुसऱ्या स्थानावर आला.