Ind Vs Eng T20 Live Update Score : इंग्लंड संघाचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यानं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दव फॅक्टर महत्त्वाचा होणार असल्यानं इंग्लंडच्या कर्णधारानं हा निर्णय घेतला. विराट कोहलीलाही ( Virat Kohli) प्रथम गोलंदाजीच करायची होती, परंतु नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूनं लागला नाही. या सामन्यात इंग्लंडचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरले. इंग्लंडचे दिग्गज गोलंदाज जोए बेंजामिन ( Joel Benjamin) यांना श्रद्धांजली म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी काळी पट्टी बांधली आहे. ( England players to wear black armbands )
रोहित शर्माला विश्रांती ( Rohit Sharma rested) रोहित शर्मा ( Rohit Sharma) याला सुरुवातीच्या काही सामन्यांत विश्रांती देणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीनं स्पष्ट केलं. त्यामुळे आजच्या सामन्यात लोकेश राहुल ( KL Rahul) आणि शिखर धवन ( Shikhar Dhawan) सलामीला उतरले आहेत.
भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, वॉशिंग्टर सुंदर, शार्दुल ठाकूर.
इंग्लंड : जेसन रॉय, इयॉन मॉर्गन (कर्णधार), जोस बटलर, डेवीड मलान, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदील रशीद, मार्क वूड
कोण होते जोए बेंजामिन ?९ मार्चला बेंजामिन यांचे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले. १९९०च्या दशकात इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे माजी जलदगती गोलंदाज जोए बेंजामिन ( Joel Benjamin) ६० वर्षांचे होते. त्यांनी ३३व्या वर्षी १९९४साली इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याचवर्षी त्यानं वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना दीर्घकाळ खेळता आले नाही, तर कौंटी क्रिकेटमध्ये त्यांनी बरीच वर्ष गाजवली.
त्यांनी सरे क्रिकेट क्लकडून दमदार कामगिरी केली. १९६१मध्ये कॅरेबियन बेट सेंट किट्स येथे त्यांचा जन्म झाला आणि १५ वर्षांचे असताना ते कुटुबीयांसह ब्रिटेनमध्ये स्थायिक झाले. त्यांनी वॉर्विकशर कौंटीतून खेळण्यास सुरुवात केली. २७ वर्षांचे असताना त्यांनी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. १९८८मध्ये त्यांनी वॉर्विकशरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १९९२नंतर ते सरे क्लबकडून खेळू लागले. त्यांनी प्रथम श्रेणी व लिस्ट ए क्रिकेटमध्ये मिळून 560 विकेट्स घेतल्या आहेत.