India vs England 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ५० धावांनी विजय मिळवला. इंग्लंडवरील धावांच्या बाबतीत हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. भारताच्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १४८ धावांत तंबूत परतला. ५१ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिकने चार विकेट्स घेत विक्रमाला गवसणी घातली. रोहित शर्मानेही पुनरागमन करताना विजय मिळवून सलग १३ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तरीही भारतीय खेळाडूंवर रोहित नाराज आहे.
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडला नमवून जगात ठरला अव्वल!
रोहित शर्मा ( २४), दीपक हुडा ( ३३) , सूर्यकुमार यादव ( ३९) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५१ धावा करताना ट्वेंटी-२०तील पहिले अर्धशतक झळकावले. दिनेश कार्तिक ( ११) व अक्षर पटेल ( १७ ) यांनी हातभार लावला. भारताने ८ बाद १९८ धावा केल्या. मोईन अली ( २-२६) व ख्रिस जॉर्डन ( २-२३) यांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का देताना कर्णधार जोस बटलरचा त्रिफळा उडवला. त्यानंतर हार्दिक पांड्याने ७ चेंडूंत तीन विकेट्स घेताना इंग्लंडला हादरवले. युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणाला दोन सेट फलंदाज माघारी पाठवले. इंग्लंडचा संपूर्ण संघ १४८ धावांत माघारी परतला. पदार्पणवीर अर्षदीप सिंग यानेही १८ धावांत २ विकेट्स घेतल्या.
तरीही या सामन्यात भारतीय खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणावर रोहित शर्मा नाराज आहे. दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा आदींनी जवळपास ३-४ सोपे झेल टाकले. त्यामुळे सामन्यानंतर रोहितने खेळाडूंची कानउघडणी केली.
तो म्हणाला, ''गोलंदाजीत उत्तम कामगिरी झाली. फलंदाज ज्या निर्धाराने मैदानावर उतरले, ते पाहून आनंद झाला. उत्तम क्रिकेटींग शॉट्स त्यांनी खेळले. हाच अप्रोच हवा आहे, परंतु तो सर्वांना दाखवायला हवा. हार्दिक पांड्याने आयपीएलपासून जे सातत्य दाखवलंय ते वाखाण्यजोगे आहे. त्याच्या गोलंदाजीने मी अधिक प्रभावित झालो. फक्त क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांमुळे नाराज आहे. त्या कॅच घेता आल्या असत्या. क्षेत्ररक्षणात आपल्याला उच्च दर्जा सेट करायचा आहे. त्यामुळे कालची कामगिरी अभिमानास्पद नाही.''