IND vs ENG 1st Test Match Live Updates | हैदराबाद: भारतीय संघाचा मायदेशात कायम दबदबा राहिला आहे. हा दबदबा संपवण्याच्या इराद्याने इंग्लिश संघ भारत दौऱ्यावर आला आहे. आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. सलामीचा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या इंग्लिश संघाची फजिती झाली. भारतीय फिरकीपटूंनी प्रतिस्पर्धी संघाला आपल्या तालावर नाचवले. इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. ५०.३ षटकांपर्यंत इंग्लंडची धावसंख्या ७ बाद १६१ आहे. फिरकीपटू रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ बळी घेऊन पाहुण्या संघाच्या फलंदाजीची कंबर मोडली. तर जसप्रीत बुमराहला एक बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी इंग्लंडचा माजी खेळाडू केविन पीटरसनने एक भविष्यवाणी केली. इंग्लंडचा संघ आज ९ बाद ४५० धावा करून डाव घोषित करेल का? असा प्रश्न त्याने चाहत्यांना केला. पण, भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केल्यानंतर संघाचा माजी खेळाडू वसीम जाफरने पीटरसनच्या पोस्टचा दाखला देत त्याची खिल्ली उडवली.
खरं तर सुरूवातीला मोठ्या धावसंख्येचे स्वप्न पाहणाऱ्या पीटरसनने सामना सुरू झाल्यानंतर मवाळ भूमिका घेतली. भारतीय फिरकीपटूंची कमाल पाहिल्यानंतर पीटरसनने आणखी एक पोस्ट केली. "कदाचित हा सामना केवळ दोन दिवसांचा होईल", अशी प्रतिक्रिया इंग्लंडच्या माजी खेळाडूने दिली. मग जाफरने पीटरसनच्या दोन्ही पोस्ट शेअर करत 'घर से निकलते ही' आणि 'कुछ दूर चलते ही' अशा आशयाची भन्नाट पोस्ट केली. तसेच या पोस्टचा अनुवाद भारतीय खेळाडू दिनेश कार्तिक करेल असेल सांगितले, जो सध्या समालोचन करत आहे.
पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जोनी बेअरस्टो, झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच.