IND vs ENG 1st Test Match Live Updates । हैदराबाद: दुसऱ्या दिवसअखेरपर्यंत अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने इंग्लिश गोलंदाजांना घाम फोडला. दोन्हीही अष्टपैलू खेळाडू नाबाद परतले असून भारत मजबूत स्थितीत आहे. यजमान भारताने दुसऱ्या दिवसअखेर १७५ धावांची आघाडी घेतली आहे. भारताने ११० षटकांत ७ बाद ४२१ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची जोडी नाबाद परतली. त्यामुळे तिसऱ्या दिवसाची सुरूवात स्फोटक करण्यावर टीम इंडियाचे लक्ष असेल. जडेजाने २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने १५५ चेंडूत नाबाद ८१ धावा केल्या, तर अक्षरने १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा कुटल्या. दिवसाच्या अखेरीस या जोडीने स्फोटक खेळी केली. अक्षरने दुसऱ्या दिवसातील अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून आपला इरादा स्पष्ट केला. एकूणच आजचा दिवस लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी गाजवला. दोघांनीही अर्धशतकी खेळी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवण्यात मोठा हातभार लावला.
भारताने पहिल्या दिवसअखेर १९ षटकांत १ बाद ११९ धावा केल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने आजही त्याच्या शैलीप्रमाणे स्फोटक खेळी करण्याचा प्रयत्न केला. पण चौकार मारून त्याला तंबूत परतावे लागले. त्याने १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ चेंडूत ८० धावांची अप्रतिम खेळी केली. भारताकडून यशस्वी जैस्वाल (८०), रोहित शर्मा (२४), शुबमन गिल (२३) आणि श्रेयस अय्यरने (३५) धावा केल्या. लोकेश राहुलने (८६) धावांची मोठी खेळी करून भारताचा डाव सावरला. त्यानंतर केएस भरतने (४१) धावा केल्या. मग फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी इंग्लिश गोलंदाजांना बळीसाठी तरसावले.
पाहुण्या संघाकडून टॉम हार्टली आणि जो रूट यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर जॅक लिच आणि रेहान अहमद यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. भारतीय फिरकीपटूंनी गोलंदाजीत कमाल केली. पण, इंग्लंडच्या हार्टलीने २५ षटकांत तब्बल १३१ धावा दिल्या. आर अश्विन हार्टलीच्या हातून धावबाद झाला.
दरम्यान, गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. सलामीचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव अवघ्या २४६ धावांवर आटोपला. इंग्लिश संघाकडून कर्णधार बेन स्टोक्सने दमदार खेळी केली पण त्यालाही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली नाही. पाहुण्या संघाने आपल्या पहिल्या डावात ६४.३ षटकांत सर्वबाद २४६ धावा केल्या. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारून मजबूत आघाडी घेण्याची सुवर्णसंधी यजमान भारताकडे आहे.
पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), जोनी बेअरस्टो, झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच.