IND vs ENG 1st Test Match Live । हैदराबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. आजपासून सलामीचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव अवघ्या २४६ धावांवर आटोपला. इंग्लिश संघाकडून कर्णधार बेन स्टोक्सने दमदार खेळी केली पण त्यालाही सन्मानजनक धावसंख्या उभारता आली नाही. पाहुण्या संघाने आपल्या पहिल्या डावात ६४.३ षटकांत सर्वबाद २४६ धावा केल्या.
दरम्यान, सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना फलंदाजीची पुरेशी संधी मिळाली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने आक्रमक पवित्रा दाखवत ७० चेंडूत नाबाद ७६ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने इंग्लिश गोलंदाजांचा समाचार घेतला. भारताने पहिल्या दिवसाअखेर २३ षटकांत १ बाद ११९ धावा केल्या आहेत. अशातच पाहुण्या संघाचा यष्टीरक्षक बेन फोक्सचा एक भन्नाट व्हिडीओ समोर आला ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रात इंग्लंडचा पहिला डाव आटोपला. भारतीय फिरकीसमोर इंग्लंडचे फलंदाज दिवसभरही टिकू शकले नाहीत. त्यानंतर टीम इंडियाचा डाव सुरू झाला आणि तिसर्या षटकातच इंग्लंडचा यष्टिरक्षक बेन फोक्स गडबडला.
इंग्लिश खेळाडूची फजिती
भारताच्या डावाच्या तिसऱ्या षटकात वेगवान गोलंदाज मार्क वुड षटक टाकत होता. त्याचा पहिला चेंडू रोहित शर्माने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला आणि त्याने धाव घेतली. क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकला तेव्हा यष्टीरक्षक फोक्स तो पकडण्यासाठी धावला. इथेच त्याची चूक झाली अन् तो स्टम्प घेऊन खाली पडला. लक्ष चेंडूवर असल्याने फोक्सला स्टम्प दिसले नाहीत आणि तो तिन्ही स्टम्पसह स्वतः मैदानावर पडला.
पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, केएस भरत, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.
पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ -
बेन स्टोक्स (कर्णधार), जोनी बेअरस्टो, झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच.
Web Title: IND vs ENG 1st Test Match Live Updates england wicketkeeper Ben Foakes funny video viral on social media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.