IND vs ENG 1st Test Live Updates Day 3 ( Marathi News ) - भारतीय संघाने पहिल्या कसोटीवरील पकड मजबूत केली आहे. इंग्लंडच्या २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने मजबूत आघाडी घेतली आहे. लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा या तिघांनाही शतकापासून वंचित रहावे लागले. इंग्लंडचे प्रमुख फिरकीपटू अपयशी ठरलेले असताना फलंदाज जो रूटने गोलंदाजीत कमाल करून दाखवली.
इंग्लंडच्या पहिल्या डावातील २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने मजबूत आघाडी घेतली आहे. यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून देताना ७४ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा चोपल्या. रोहित शर्मा ( २४), शुबमन गिल ( २३ ) व श्रेयस अय्यर (३५) यांनी मोठी खेळी साकारली नसली तरी त्यांचे मैदानावर उभे राहणे महत्त्वाचे ठरले. लोकेश राहुलने १२३ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह केलेली ८६ धावांची खेळी अप्रतिम होती. श्रीकर भरतने मिळालेली संधी दोन्ही हाताने कवेत घेतली आणि ८१ चेंडूंत ४१ धावांची परिपक्व खेळी करून दाखवली. आऱ अश्विन १ धाव करून माघारी परतला.
रवींद्र जडेजा व अक्षर पटेल या डावखुऱ्या फलंदाजांनी इंग्रजांचा घाम काढला. या दोघांच्या ७८ धावांच्या भागीदारीला जो रूटने ब्रेक लावला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने रवींद्र जडेजाला पायचीत केले. जडेजा १८० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ८७ धावांवर बाद झाला. या डावात शतकापासून हुकलेला जडेजा हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. रूटने पुढील चेंडूवर जसप्रीत बुमराहचा त्रिफळा उडवला. मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या रूटला हॅटट्रीक पूर्ण करू दिली नाही. रेहान अहमदने शेवटची विकेट घेताना भारताचा पहिला डाव ४३६ धावांवर गुंडाळला. अक्षर पटेल ४४ धावांनी माघारी परतला, परंतु भारताने पहिल्या डावा १९० धावांची आघाडी घेतली.
Web Title: ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board - India bowled out for 436 - lead of 190 runs, Jadeja, KL and Jaiswal missed out on deserving hundreds
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.