IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 - आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या प्रत्येकी दोन विकेट्सने इंग्लंडला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले आहे. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) च्या एका विकेटने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले. भारतीय गोलंदाजांनी कमाल करताना इंग्लंडचा निम्मा संघ १२५ धावांवर तंबूत पाठवला.
बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली, परंतु आर अश्विनने दोन व रवींद्र जडेजाने १ विकेट घेत इंग्लंडला बिनबाद ५५ वरून ३ बाद ६० असे बॅकफूटवर फेकले. बेन डकेट व झॅक क्रॉली यांनी Bazball प्रथा कायम राखताना ६७ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली आणि यात ४० धावा या चौकारातून मिळवल्या होत्या. डकेटने ७ चौकारांच्या मदतीने ३९ चेंडूंत ३५ धावा केल्या, तर ओली पोप ( १) व क्रॉली ( १९) स्वस्तात बाद झाले. जो रूट ( Joe Root) व जॉनी बेअऱस्टो या जोडीने डाव सावरला आणि लंच ब्रेकपर्यंत संघाला ३ बाद १०८ धावांपर्यंत पोहोचवले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १०५ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली.
अक्षर पटेलने अप्रतिम चेंडूवर बेअरस्टोचा ( ३७) त्रिफळा उडवला. चेंडू असा वळला की बेअरस्टोची बॅट चकवून तो उजव्या यष्टीवर सहज आदळला. इंग्लंडचा फलंदाज पाहतच राहिला. त्यानंतर जडेजाच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा प्रयत्न रुटला ( २९) महागात पडला आणि बुमराहने सोपा झेल घेतला. इंग्लंडचा निम्मा संघ १२५ धावांवर माघारी. भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक २५५५ धावांच्या रिकी पाँटिंगच्या विक्रमाशी आज रूटने बरोबरी केली.