Join us  

भारतीयांचा 'हार्ट'ली ब्रेक! १९० धावांची आघाडी घेऊनही झाली हार, इंग्लंडचा चमत्कार 

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard :  भारत-इंग्लंड पहिली कसोटी नाट्यमयरित्या पाहुण्यांनी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 5:31 PM

Open in App

India Vs England 1st Test match Day 4 Live Scorecard :  भारत-इंग्लंड पहिली कसोटी नाट्यमयरित्या पाहुण्यांनी जिंकली. पहिल्या डावात १९० धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने दमदार पुनरागमन करून बाजी मारली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ऑली पोपच्या १९६ धावांच्या खेळीने टीम इंडियाच्या चेहऱ्यावर प्रचंड नैराश्य निर्माण केले. त्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंनी यजमानांना त्यांच्याच जाळ्यात ओढले. आर अश्विन आणि केएस भरत यांनी चिकाटीने खेळ करून भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु टॉम हार्टलीने पाचवी विकेट घेताना भरतचा त्रिफळा उडवला. त्यानंतर अश्विनलाही ( २८) माघारी पाठवले. हार्टलीने सातवी विकेट घेऊन भारताचा पराभव पक्का केला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच १००+ धावांची आघाडी घेऊनही भारताला हार मानावी लागली. 

Blog : वेस्ट इंडिज क्रिकेटला पुनरुज्जीवन देणारा ३५० लोकसंख्या असलेल्या गावाचा नायक! दुर्गम भागातून आला अन्... 

२३१ धावांचा पाठलाग करणे सोपे नक्कीच नव्हते, कारण खेळपट्टी फिरकीपटूंना पोषक बनलेली.  पदार्पणवीर टॉम हार्टलीने भारताला धक्क्यांमागून धक्के दिले. यशस्वी जैस्वाल ( १५), शुबमन गिल ( ०) यांना मागोमाग माघारी पाठवल्यानंतर हार्टलीने भारतीयांना हर्ट केले. त्याने कर्णधार रोहित शर्माला ( ३९) पायचीत केले. फलंदाजीच्या क्रमवारीत प्रमोशन मिळालेल्या अक्षर पटेलने आश्वासक फटके मारले, परंतु हार्टलीने त्यालाही ( २२) माघारी पाठवले. जो रूटने चकवा देणारा चेंडू टाकून लोकेश राहुलला ( २२) पायचीत केले.  खेळपट्टीवर उभं राहण्याची आवश्यकता असताना रवींद्र जडेजाने ( २) घाई केली आणि बेन स्टोक्सने डायरेक्ट थ्रो करून त्याला रन आऊट केले. Ind vs Eng 1st Test Live Updates

आर अश्विन आणि केएस भरत यांनी भारतासाठी खिंड लढवली आणि २०.३ षटकं संयमानं खेळ करून अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. दिवसाचा खेळ संपायला तीन षटकं शिल्लक असताना केएस भरतची एकाग्रता तोडण्यात हार्टीला यश आले. त्याने टाकलेला चेंडू जास्त उडाला नाही आणि भरतचा त्रिफळा त्याने उडवला. भरत ५९ चेंडूंत २८ धावांवर माघारी परतला आणि अश्विनसोबत त्याची २१.३ षटकांत ५७ धावांची भागीदारी संपुष्टात आली.  हार्टलीने डावात पाचवी विकेट घेतली. रूटच्या पुढच्या षटकात अश्विनचे दोन झेल उडाले, परंतु सुदैवाने तिथे खेळाडू उभा नव्हता. पण, हार्टलीच्या नावावर ही विकेट होती. पुढे येऊन फटका मारण्याच्या प्रयत्नात अश्विन ( २८) यष्टीचीत झाला. मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांनी २५ धावांची भागीदारी करून संघर्ष दाखवला, परंतु हार्टलीने सिराजला ( १२) बाद करून भारताचा डाव २०२ धावांवर गुंडाळला. इंग्लंडने २८ धावांनी हा सामना जिंकला. हार्टलीने ६२ धावा देताना ७ विकेट्स घेतल्या. Ind vs Eng live match, Ind vs Eng Live Scorecard

तत्पूर्वी, १९० धावांची पिछाडी भरून काढताना इंग्लंडचा निम्मा संघ १६३ धावांत तंबूत परतला होता.  ऑली पोप व बेन फोक्स ( ३४) यांनी ११२ धावांची भागीदारी करून भारताला बॅकफूटवर फेकले. पोपने तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन इंग्लंडला २३० धावांची आघाडी मिळवून दिली. त्याने रेहान अहमदसह ( २८) ६४ आणि टॉम हार्टलीसह ( ३४) ८० धावा जोडल्या. पोप २७८ चेंडूंत २१ चौकारांसह १९६ धावांवर बाद झाला आणि जसप्रीतने त्याचा त्रिफळा उडवला. इंग्लंडचा दुसरा डाव ४२० धावांत संपुष्टात आला आणि भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य उभे राहिले. IND vs ENG 1st Test Live Scoreboard 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजारोहित शर्माबेन स्टोक्स