IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 ( Marathi News ) - भारतीय गोलंदाजांनी पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव गुंडाळला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने ७० धावांची खेळी करून दमदार खेळ केला, परंतु जसप्रीत बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला आणि इंग्लंडचा डाव २४६ धावांवर संपुष्टात आला. बुमराहच्या चेंडूवर बाद झाल्यानंतर स्टोक्सने त्याच्या गोलंदाजीला दाद दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडला पहिल्या डावात २४६ धावा करता आल्या. झॅक क्रॉली ( २०) व बेन डकेट ( ३५) यांच्या आक्रमक सुरुवातीनंतर आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडला धक्के दिले. जो रूट ( २९) व जॉनी बेअरस्टो ( ३७) यांनी मधल्या फळीत चांगला खेळ केला, परंतु अक्षर पटेलने सुरेख मारा करून ही जोडी तोडली. इंग्लंडची अवस्था ६ बाद १३७ झाली होती आणि भारताला त्यांना झटपट गुंडाळण्याची संधी होती. पण, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स उभा राहिला. त्याने तळाच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन संघाला अडिचशे धावांच्या नजीक केले. टॉम हार्टलीने २३ धावांचे योगदान दिले. स्टोक्सने ८८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७० धाव केल्या आणि इंग्लंडचा पहिला डाव ६४.३ षटकांत २४६ धावांवर गडगडला.
आर अश्विन ( ३-६८), रवींद्र जडेजा ( ३-८८), अक्षर पटेल ( २-३३) व जसप्रीत बुमराह ( २-२८) यांनी विकेट्स घेतल्या. जसप्रीतच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाल्यानंतर स्टोक्सनेही त्या चेंडूला दाद दिली. इंग्लंडच्या २४६ धावांच्या प्रत्युत्तरात भारताला यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात करून दिली. पदार्पणवीर टॉम हार्टलीने पहिले षटक फेकले. १९२१ नंतर प्रथमच इंग्लंडच्या फिरकीपटूने पदार्पणात डावाची सुरुवात केली आहे. तेव्हा जॅक व्हाईटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध लीड्समध्ये पहिले षटक टाकले होते.