IND vs ENG 1st Test ( Marathi News ) : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का बसला आणि तो म्हणजे त्यांचा फिरकीपटू शोएब बशीर याला व्हिसा नाकारण्यात आल्याने मायदेशी परतावे लागले. त्यामुळे बशीरला पहिल्या कसोटीत खेळता येणार नाही. बेन स्टोक्सने व्हिसा कारणावरून बशीरला पहिल्या कसोटीला मुकावे लागल्याने नाराजी व्यक्त केली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) जेव्हा आज पत्रकार परिषदेत आला तेव्हा इंग्लंडच्या पत्रकाराने त्याला बशीर संदर्भात प्रश्न विचारला. त्यावर रोहितने त्याचा राग आवरत मजेशीर उत्तर दिले.
भारताला पराभूत करण्यासाठी इंग्लंड संघाने २० वर्षीय फिरकीपटूला संघात स्थान दिले होते, परंतु तो पहिली कसोटी खेळू शकणार नाही. स्टोक्स म्हणाला होता की, आम्ही डिसेंबरमध्ये संघाची घोषणा केली होती आणि बशीरला येथे येण्यासाठी व्हिसा मिळत नाही. मी त्याच्यासाठी निराश आहे. तो कसोटी खेळण्यासाठी खूप आतुर होता, परंतु आता त्याला कसे वाटत असेल, हे मी अनुभवू शकतो. पण, अशा परिस्थितीतून गेलेला तो पहिला क्रिकेटपटू नाही. मी अशा अनेकांसोबत खेळलो आहे की ज्यांच्यासोबत हे घडले आहे. आम्ही निवडलेला खेळाडू संघात नाही हे मला खूप विचित्र वाटते.
मला त्याच्याबद्दल वाईट वाटते, पण... - रोहित शर्मापत्रकार परिषदेत रोहितला बशीरबद्दल प्रश्न विचारल्यावर त्याने त्याच्याबद्दल वाईट वाटते असे म्हटले. तो पुढे म्हणाला, तो कदाचित पहिल्यांदाच येत आहे आणि नवीन देशाची व्हिसा प्रक्रिया पूर्ण करणे कोणासाठीही सोपे नाही. दुर्दैवाने, मी तुम्हाला याबद्दल अधिक तपशील देण्यासाठी व्हिसा कार्यालयात बसत नाही.
इंग्लंडचा संघ ( England Men's XI ) - झॅक क्रॅव्ली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स ( कर्णधार), बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड, जॅक लिच