IND vs ENG 1st Test Rohit Sharma press conference ( Marathi News ) : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीने ( Virat Kohli) वैयक्तिक कारणास्तव पहिल्या दोन सामन्यांतून माघार घेतली. भारतीय संघासाठी हा खूप मोठा धक्का होता. विराटच्या जागी संघात अजिंक्य राहणे, चेतेश्वर पुजारा, सर्फराज खान व रजत पाटीदार या नावांची चर्चा होती. पण, हाती आलेल्या वृत्तानुसार रजतची भारतीय संघात विराटच्या जागी निवड करण्यात आली आहे. याबाबत कर्णधार रोहित शर्मा याला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला आणि त्यात हिटमॅनने मोठं विधान केलं.
इंग्लंडच्या 'Bazball'वर रोहित शर्माचा षटकार; म्हणाला, ते कसे खेळतात यापेक्षा...
विराटने कर्णधार रोहित व संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेतल्याचे बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यात बीसीसीआयने म्हटले की, बीसीसीआयने विराटच्या निर्णयाचा आदर केला आहे. बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने स्टार फलंदाजाला पाठिंबा दिला आहे. मीडिया आणि चाहत्यांना विनंती आहे की, त्यांनी विराटच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्याच्या वैयक्तिक कारणाचा अंदाज लावणे थांबवा.
विराटच्या माघारीमुळे चेतेश्वर पुजाराची निवड होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पुजारा सध्या रणजी करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करतोय. पण, तेच दुसरीकडे अजिंक्य रहाणेला मुंबईकडून खेळताना दोन सामन्यांत भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे पुजारा पुनरागमनाच्या शर्यतीत आघाडीवर होता. त्याचवेळी सर्फराज खान व रजत पाटीदार या युवा खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. अशात रजतच्या निवडीचे वृत्त समोर आले. रजतने ५५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५.९७ च्या सरासरीने ४ हजार धावा केल्या आहेत आणि त्यात १२ शतकं व २२ अर्धशतकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड लायन्सविरुद्धच्या कसोटीत त्याने शतकी खेळी केली आहे.
विराटच्या अनुपस्थितीत संघात सीनियर खेळाडू निवडायला हवा होता, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. त्यावर रोहित म्हणाला, विराटच्या गैरहजेरीत अनुभवी खेळाडू संघात निवडावा असा विचार आम्हीही करत होतो, परंतु मग युवा खेळाडूंना आम्ही संधी कधी देणार, असाही प्रश्न मनात आला. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला. मात्र, याचा अर्थ असा नाही की सीनियर खेळाडूंचा परतीचा मार्ग बंद झाला आहे. ते चांगली कामगिरी करून पुनरागमन करू शकतात.