विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीतील सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. न्यूझीलंडच्या 240 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाचा डाव सुरुवातीलाच ढेपाळला. रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही लागलीच विकेट दिली. त्यामुळे 3 बाद 5 अशी दयनीय अवस्था टीम इंडियाची झाली होती. त्यानंतरही दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत लगेचच बाद झाले. त्यामुळे भारत पराभवाच्या छायेत होता. तरीही, कोट्यवधी भारतीयांच्या विराट अपेक्षांचं ओझं महेंद्रसिंह धोनीवर होतं. आता, महेंद्रसिंह धोनीच्या सोबतीला हार्दीक पंड्याही होता. पण, धावांची गती वाढविण्याच्या नादात पंड्यानंही चुकीचा उत्तुंग फटका मारला आणि उरल्या-सुरल्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या. हार्दीक पंड्या झेलबाद झाल्यानंतर 6 बाद 92 अशी पराभवजन्य परिस्थिती टीम इंडियाची होती. एकीकडे विजयासाठीचा स्ट्राईक रेट वाढत असताना दुसरीकडे विकेट सांभाळून खेळ करणे गरजेचं होतं. त्यामुळे, पुन्हा धोनीच्या संयमी खेळाकडे कोट्यवधी भारतीयांच्या नजरा लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी धोनीच्या वयावरुन त्याच्यावर टीका करणारेही धोनी है तो मुमुकीन है... असं म्हणत आपल्या मनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. भारत जिंकेल अशी आशा शेवटच्या क्षणापर्यंत बाळगून होते.
माहीच्या जोडीला आता मैदानात सर रविंद्र जडेजा होता. एकमेकांना साथ देत जडेजा आणि धोनी मैदानात धावत होते, धावा काढत होते, एखादा चौकार बसतो का ते पाहात होते. तर, एखादा षटकार मारण्याचाही प्रयत्न होता. मात्र, सरतेशेवटी विकेट टिकवून खेळण्याचं दडपण आणि कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांमुळे धावांमधील संथगती कायम होती. त्यातही, जडेजाकडून सर करण्याचा प्रयत्न होत होता, अन् धोनी संयमान खेळत होता. टीम इंडियाने पुन्हा एकदा सामन्यात वापसी केली होती. जडेजाने अर्धशतक झळकावताच भारत विजयाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. जडेजाच्या प्रत्येक चौकार अन् षटकारावर टाळ्या अऩ् शिट्ट्या वाजल्या जात होत्या. तर, धोनीच्या संयमी खेळाचंही कौतुक होतं होतं. प्रथमच विश्वचषक पाहत असल्याचा फील भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसून येत होता. बॅटला बॉल लागताच अन् टीव्हीवर दिसणाऱ्या चेंडूवर नजर जाताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत होता. कारण, कित्येक दिवसानंतर टीव्हीसमोर बसून कोट्यवधी भारतीय एकसाथ क्रिकेट पाहत होते.
महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जडेजाची शतकी भागिदारी होताच भारत विजयी होईल, अशी आशा भारतीयांना होती. मात्र, एकीकडे धावांची गती वाढवणे गरजेचं असल्याने उत्तुंग फटका मारताना सर जडेजा बाद झाला. जडेजाने 59 चेंडूत 77 धावा करुन टीम इंडियाला सर केलं, तर धोनीने सिंगल-डबल करत शेवटपर्यंत खेळून दाखवलं. पण, विजयासाठी हवा असणारा स्ट्राईक रेट गाठण्यात टीम इंडियाला अपयश आलं. जडेजानंतर धोनीही 47 व्या षटकात दुर्दैवी धावबाद झाला. त्यानंतर, भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. मात्र, जडेजा आणि धोनीच्या जोडीने किवींच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही घाम सोडला होता. धोनीच्या संयमी खेळीने आजही शेवटच्या क्षणापर्यंत 'धोनी है तो मुमुकीन है'... अशी आशा सर्व भारतीयांना होती. चार दिवसांपूर्वी धोनीवर टीका करणारेही अबे धोनी हाय ना.. असं सांगून एकमेकांना समजावत होते. शेवटपर्यंत किवींनी ठेवलेल्या धावांचा डोंगर 'सर' करताना जडेजानं उत्कृष्ट खेळ केला. तर धोनीनंही आपला अनुभव दाखवून दिला. वय वाढल्यानंतर माणूस म्हातारा होत नसतो, तर त्याचा अनुभव दांडगा होत असतो. म्हणूनच विश्वचषक सामन्यातील टीम इंडियाचा आजचा सामना धोनी-जडेजा जोडीमुळं सर्वोत्कृष्ट ठरला. कारण, सामना भारत हरला असला तरी, आज क्रिकेट जिकंलयं. म्हणूनच म्हणावं वाटतंय. जडेजानं 'सर' केलं, धोनीनं खेळून दाखवलं. म्हणूनच किवींच्या विजयानंतरही भारत हरला असला तरी धोनी आणि जडेजानं मन जिंकलं,असंच म्हणावं लागेल.