India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासमोर आता यजमानांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्याआधीच टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल ( Shubman Gill) याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत कसोटी मालिकेत सलामीला कोण उतरणार हा पेच कर्णधार विराट कोहलीसमोर उभा राहिला. तो सोडवण्यासाठी विराट आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी निवड समितीकडे एक मागणी केली होती. पण, निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी ती मागणी फेटाळून लावली. आता विराट व शास्त्री यांना आहे त्याच खेळाडूंमधून तोडगा काढावा लागणार आहे.
काय होती मागणी?
शुबमनच्या माघारीनंतर निवड समितीकडे पृथ्वी शॉसाठी मागणी करण्यात आली होती. पृथ्वी सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि तिथून त्याला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची मागणी विराट व शास्त्री यांनी केल्याचे वृत्त होते. पण, सध्या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघात मयांक अग्रवाल व लोकेश राहुल या बॅक अप ओपनरसह अभिमन्यू इश्वरन हे पर्याय आहेत. त्यामुळेच निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी ही मागणी फेटाळून लावली.
''शुबमन गिल यानं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे आणि तो मायदेशात परतणार आहे. जवळपास तीन महिने तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. संघ व्यवस्थापनानं मागील महिन्यात ई मेल द्वारे चेतन शर्मा यांच्याकडे दोन सलामीवीरांची मागणी केली होती,''असे सूत्रांनी सांगितले.
मयांक आणि लोकेश यांच्याकडे कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे, इश्वरन हा राखीव सलामीवीर म्हणून संघासोबत गेला आहे. गिलच्या माघारीनंतर गरज वाटल्यास इश्वरनचा मुख्य संघात समावेश करण्याचा सल्ला निवड समितीनं दिला आहे.
कपिल देव यांनी व्यक्त केली नाराजीभारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी कोहली व शास्त्री यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. संघात लोकेश राहुल, मयांक अग्रवाल असतानाही पृथ्वी शॉ याला इंग्लंड दौऱ्यासाठी विचारणा करण्यावर कपिल देव यांनी संताप व्यक्त केला. हा संघातील खेळाडूंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ''अशी मागणी करण्याची गरज नव्हती. निवड समितीचा आदर करायला हवा. त्यांनी संघ निवड केली आणि विराट व शास्त्री यांचाही त्यात सहभाग होताच. तुमच्याकडे मयांक अग्रवाल व लोकेश राहुल हे सलामीवीर आहेत. तरीही तुम्हाला तिसरा पर्याय हवाय?; हे चुकीचं आहे,''असे कपिल देव म्हणाले.